राज्य सरकारमुळेच मराठा बांधवांचे आंदोलन पेटले आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. मराठा संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी ५८ मोर्चे अत्यंत शांततेत काढले. मात्र या सगळ्या मोर्चांकडे आणि मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले. ते केले नसते तर आज आंदोलनाचा भडका उडाला नसता. मराठा संघटनांच्या महाराष्ट्र बंदला आपला पूर्ण पाठिंबा आहे असेही त्यांनी म्हटले आहे. आज सकाळी ते आंदोलनात सहभागीही झाले होते.

मराठा बांधव मूक मोर्चे काढून आपले म्हणणे शांततेच्या मार्गाने सरकारपर्यंत पोहचवत होते. मात्र या समाजाच्या मागण्यांकडे आणि या मोर्चांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळेच आंदोलनाचा भडका उडाला, आता आरक्षणसाठी या सरकारवर दबाव निर्माण करावा लागेल. हे सरकार मराठा आरक्षणाचे आश्वासन देऊन सत्तेत आले मात्र त्यांनी आपले आश्वासन पाळले नाही. सरकारचे धोरण फसवणूक करणारे आहे असाही आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

दरम्यान आज सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला नाशिक, पुणे, औरंगाबाद या ठिकाणी हिंसक वळण लागले. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आंदोलकांनी तोडफोड केली. तर चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. औरंगाबादमध्येही धक्काबुक्कीचे प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.