धर्माला संवैधानिक मान्यता आणि अल्पसंख्याक दर्जा देण्याची मागणी

मराठा समाजाने आपल्या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर शक्तिप्रदर्शन केल्यानंतर रविवारी लातुरात लिंगायत समाजाने आपल्या धर्माला संवैधानिक मान्यता आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत लाखापेक्षा अधिक जनसमुदाय एकत्रित केला. या शक्तिप्रदर्शनानंतर लिंगायत समाजही आपल्या मागण्यांसाठी जागरूक झाल्याचे दिसून येते आहे.

मराठा समाजाच्या नावावर अनेक प्रस्थापितांनी राजकारण केले. समाजाचा वापर करत स्वत लाभ उठवला व समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे डोळेझाक केली. याची चीड सामान्य मराठा समाजात निर्माण झाली व त्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेले विविध जिल्हय़ातून व अंतिमत मुंबईत प्रचंड मोठय़ा मोर्चात रूपांतर झाले. या मोर्चाने यापूर्वीच्या मोर्चाचे अनेक रेकॉर्ड मोडले.

लिंगायत समाजाने आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर मराठा मोर्चाला प्रतिक्रिया म्हणून हा मोर्चा असेल असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता, मात्र तो फोल ठरवत अतिशय मूलभूत प्रश्न मोच्रेकऱ्यांनी यानिमित्ताने मांडले. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता द्यावी व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा ही मागणी या मोर्चाचे नेतृत्व करणारे १०२ वर्षांचे राष्ट्रसंत डॉ. शिविलग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी पुढे आणली. ही मागणी होत असताना लिंगायत समाजातील पाच प्रमुख धर्मपीठाचे जगद्गुरू बंगळूरुमध्ये एकत्र आले व त्यांनी एकमुखाने या मागणीला विरोध केला. वीरशैव समाजाचे महत्त्व अधिक असल्याचे त्यांनी घोषित केले. यानंतर काहीजणांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्याचा परिणाम मोर्चाच्या संख्येवर होईल असे अंदाज व्यक्त करण्यात येत होते.

लिंगायत समाजाच्या नावावर ज्या मंडळींनी वर्षांनुवर्षे राजकारण केले अशा प्रस्थापित राजकारण्यांनी या मोर्चाकडे पाठ फिरवली होती. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर चार दिवस अगोदर महिलांच्या आरक्षणाची मागणी केली पाहिजे, अशी भूमिका मांडत मोर्चाच्या मागण्यांना विरोध केला होता. या प्रकारानंतर ग्रामीण भागातील गोरगरीब, सामान्य लिंगायत समाजाच्या मंडळीत धर्मगुरू व राजकारणी या दोघांच्या बाबतीतही चीड निर्माण झाली व पेटून उठत लोकांनी मोर्चा यशस्वी करण्याचे ठरवले व अपेक्षेपेक्षा प्रचंड संख्येने मोच्रेकरी लातुरात दाखल झाले.या मोर्चात प्रथम महिला जगद्गुरू माता महादेवी, जगद्गुरू बसव मृत्युंजय स्वामी, डॉ. बस्विलग पट्टदेवरू, कोरणेश्वर स्वामी उस्तुरी यांनी सहभाग दिला. महामोर्चा शांततेत पार पडावा यासाठी २ हजार स्वयंसेवक तनातीत होते. शहराच्या सर्व दिशांना वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी अल्पोपाहार व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. या मोर्चाला मराठा क्रांती मोर्चा, भारिप बहुजन महासंघ, भीमसेना, मुस्लीम संघटना यासह सुमारे ५१ संघटनांनी पाठिंबा दिला होता. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात लिंगायत धर्माची जनगणनेमध्ये स्वतंत्र धर्म म्हणून नोंद करण्यात आल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. लिंगायत हा एक अवैदिक धर्म असून त्याची तात्त्विक बठक आहे. त्यामुळे तो स्वतंत्र धर्म म्हणून सिद्ध होतो अशी भूमिका मांडण्यात आली. स्वतंत्र भारतात लिंगायत धर्माला संवैधानिक दर्जा न देऊन सरकारने लिंगायत धर्मीयांवर अन्याय केला आहे. राष्ट्रीय आणि राज्यपातळीवर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, २०२१ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत लिंगायत धर्माची लोकसंख्येची स्वतंत्र नोंद घ्यावी, आदी मागण्या मोर्चात करण्यात आल्या.

आपल्या देशात अनेक धर्म आहेत. त्यांना लोकशाही मार्गाने मान्यता मिळाली आहे. शीख, बौद्ध, ख्रिश्चन धर्मीयांना स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता आहे मग देशभर ८ कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या लिंगायत धर्माला मान्यता का नाही? असा सवाल डॉ. शिविलग शिवाचार्य महाराज यांनी उपस्थित केला. शिवाचार्य महाराजांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरच थेट प्रहार केला. नेहरू यांना लिंगायत धर्मातील नेते निजिलगप्पा यांचे प्रमुख आव्हान होते. त्यामुळे नेहरूंनी लिंगायत धर्मीयांत फूट पाडून बी. डी. जत्तींना जवळ केले व पद दिले. त्यामुळे ब्रिटिशांच्या काळात मान्यता असलेल्या या धर्माला मान्यतेपासून डावलण्याचे कारस्थान करण्यात आले. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, ओडिसा, तेलंगणा, आदी प्रांतात लिंगायत समाज आहे. या धर्माला मान्यता दिली नाही तर कुठल्याही शासनाला झोप येऊ देणार नाही,  असा इशारा शिविलग शिवाचार्य यांनी दिला आहे.

या मोर्चाचे नेतृत्व करणारे १०२ वर्षीय शिविलग शिवाचार्य महाराज हे रा. स्व. संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते. डॉ. हेडगेवार, माधवराव गोळवलकर गुरुजी यांचे ते विश्वासू सहकारी होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर अहमदपूर येथील त्यांच्या सत्कारास विद्यमान सरसंघचालक मोहन भागवत स्वत उपस्थित होते. शिवाचार्य महाराज यांनी लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता मिळावी ही जी भूमिका घेतली आहे त्याला तात्त्विक आधार असल्याचे म्हटले जाते.

दखल घ्यावी लागणार..

पुढील वर्षांत कर्नाटक प्रांतात विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या प्रांतात लिंगायत समाजाची संख्या लक्षणीय आहे, त्यामुळे लिंगायत समाजाच्या मागणीला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. लातुरात ३ सप्टेंबर रोजी मोर्चा निघाल्यानंतर १० सप्टेंबर रोजी गुलबर्गा येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा लातूरच्या मोर्चात करण्यात आली. आता ठिकठिकाणी लिंगायत समाजाने आपले शक्तिप्रदर्शन सुरू केल्यामुळे त्यांच्या मोर्चाची दखल राज्यकर्त्यांना घ्यावी लागणार आहे.