14 December 2017

News Flash

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटकात ‘टायगर स्टेट’साठी तीव्र चुरस

पुढील वर्षी होत असलेल्या व्याघ्रगणनेच्या टप्प्यात ‘टायगर स्टेट’चा दर्जा प्राप्त करण्यासाठी राज्यांमध्ये तीव्र चढाओढ

विक्रम हरकरे , नागपूर | Updated: December 28, 2012 4:45 AM

पुढील वर्षी होत असलेल्या व्याघ्रगणनेच्या टप्प्यात ‘टायगर स्टेट’चा दर्जा प्राप्त करण्यासाठी राज्यांमध्ये तीव्र चढाओढ सुरू झाली आहे. सध्या सर्वाधिक ३०० वाघांचे अस्तित्व असलेल्या कर्नाटकला ‘टायगर स्टेट’चा दर्जा देण्यात आला आहे. परंतु, कर्नाटकला देण्यात आलेल्या दर्जावर मध्य प्रदेशने आक्षेप घेतला आहे. व्याघ्रगणनेदरम्यान वाघांची चुकीची गणना झाल्याचा दावा मध्य प्रदेशने केला आहे. त्यामुळे पुढील वर्षी कर्नाटक, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यात खरी चुरस राहणार आहे.
 महाराष्ट्रातील चार व्याघ्र प्रकल्पांची स्थिती कितीही चांगली असल्याचा दावा केला जात असला तरी ‘टायगर स्टेट’च्या स्पर्धेत राज्य केव्हाच मागे पडले आहे. कर्नाटकाने साऱ्या राज्यांवर कुरघोडी केली असून सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मध्य प्रदेशलाही मागे टाकले आहे. मध्य प्रदेशकडे अनेक वर्षे हा बहुमान होता. गेल्या वर्षी कर्नाटकने त्यावर मात केली. तरीही पुढील वर्षी देशातील ४१ राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणाऱ्या वार्षिक व्याघ्रगणनेनंतर स्थिती स्पष्ट होईल. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने यंदापासून दर वर्षी व्याघ्रगणना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे वार्षिक व्याघ्रगणनेतून प्रत्येक राज्यातील वाघांची एकूण संख्या स्पष्ट झाल्यानंतर महाराष्ट्रातील स्थितीदेखील स्पष्ट होणार आहे.
 राज्यातील एकूण वाघांच्या संख्येवर या वर्षांत आतापर्यंत १२ पेक्षा जास्त वाघांचा मृत्यू होऊनसुद्धा वनाधिकारी एकमेकांवर कुरघोडी करण्यातच व्यस्त आहेत. २००५ ते २०१२ या सात वर्षांच्या कालावधीत एकूण ४१ वाघांचा मृत्यू झाल्याने राज्यात वाघांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परंतु, दुसरीकडे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि नजीकच्या जंगलक्षेत्रात ६५ वाघांचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाल्याने वन विभागात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढल्याचा दावा वन विभागातर्फे करण्यात आला असला तरी मध्य प्रदेशला मागे टाकणे महाराष्ट्रासाठी सोपे नाही. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे प्रकल्प संचालक वीरेंद्र तिवारी यांनी वाघांची संख्या वाढल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना यात २० बछडे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार ताडोबा-अंधारीत किमान ४३ वाघ वास्तव्यास असून बफर झोनमध्ये २०पेक्षा जास्त वाघ असावेत. अन्य दोन वाघ महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाच्या हद्दीतील जंगलक्षेत्रात आहेत. अलीकडच्या गणनेनुसार ताडोबात किमान ६५ वाघ नक्कीच अस्तित्वात आहेत. तरीही महाराष्ट्रात वाघांची संख्या ३००पर्यंत पोहोचण्याची शक्यता तिळमात्र नाही.
मध्य प्रदेशात या वर्षी चार वाघांचे सर्वधिक मृत्यू झाले असूनही त्यांना कर्नाटकवर मात करण्याची खात्री आहे. गेल्या व्याघ्रगणनेनुसार मध्य प्रदेशात वाघांची संख्या २५७ आहे तर कर्नाटकात ३०० वाघ आहेत. याबाबत मध्य प्रदेशचा आक्षेप असून ही आकडेवारी ‘मॅनेज’ केल्याचा संशय व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशात वाघांची संख्या ४३ ने वाढल्याचा दावा करण्यात आल्याने त्यांच्याकडील वाघांची संख्या ३००पेक्षा जास्त होणार आहे, त्यामुळे कर्नाटकला ‘टायगर स्टेट’चा दर्जा गमावण्याचा धोका आहे.     

गुप्तचर यंत्रणेचे जाळे बळकट करणार
शिकारी टोळ्यांना रोखण्यासाठी गुप्तचर यंत्रणेचे जाळे बळकट करून प्रादेशिक कार्यालये, जंगलक्षेत्रातील केंद्रे आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून विविध राज्यांमध्ये वन्यजीव गुन्हेगारी आणि गुन्हेगारांची आकडेवारी मिळवून त्याची राष्ट्रीय पातळीवर नोंद करण्याची प्रक्रियादेखील सुरू आहे.

First Published on December 28, 2012 4:45 am

Web Title: maharastra mp karnatak shows rivalry for tiger state
टॅग Tiger,Tiger State