राहाता : सध्याच्या परिस्थितीत प्राणवायूसाठी इतरांवर अवलंबून राहाणे परवडणारे नाही. त्यामुळे दैनंदिन तीन हजार मेट्रिक टन प्राणवायूनिर्मिती राज्यातच करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. शिर्डी येथील साईबाबा रुग्णालय परिसरात उभारलेल्या प्राणवायूनिर्मिती सयंत्राचे लोकार्पण आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळा शुभारंभ चाचणी सोहळा मंगळवारी दूरसंवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, पहिल्या लाटेनंतर आपण आरोग्य सेवा वाढविण्यास प्राधान्य दिले. दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त असल्याने आणि रुग्णांना प्राणवायू मोठय़ा प्रमाणात लागत असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्राणवायूनिर्मिती प्रकल्पांना चालना देण्याचे ठरविले. आपल्या राज्यासाठी आवश्यक प्राणवायूनिर्मिती राज्यातच व्हावी यासाठी ठिकठिकाणी प्राणवायू प्रकल्पांना परवानगी देण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,  प्राणवायू प्रकल्प सुरू करून साईबाबा संस्थानने सामाजिक बांधिलकी जपली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशात प्राणवायू तुटवडा असल्याचे दिसून आले. त्यातून आपण मार्ग काढला.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, जिल्ह्य़ात मध्यंतरी रुग्णसंख्या वाढली होती. ती आता घटताना दिसते आहे.पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, साईबाबा संस्थानने शिर्डी येथे कोविड  केंद्र सुरू केले असून आरटीपीसीआर चाचण्या या ठिकाणी होणार आहेत. त्यामुळे या परिसरातील रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळू शकणार आहे.  करोनाच्या संकटाचा मुकाबला राज्य शासन करीत आहे. राज्यात विकेंद्रित पद्धतीने प्राणवायू प्रकल्प उभारले जात आहेत, असे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले.  संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी या प्रकल्पाकरिता रिलायन्स फाऊंडेशनने मदत केल्याचे स्पष्ट केले.