विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेसाठी उशीर होत आहे. यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. सेना-भाजपातील अंतर्गत वादामुळे राज्यात सत्तास्थापनेला उशीर होत आहे. या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपाय सुचवत बोचरी टीका केली.

निवडणुकीचे निकाल लागून आता आठवड्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यातच सत्तावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. शिवसेनेला ५६ तर भाजपाला १०६ जागा मिळाल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही पक्षांमध्ये कुरघोडी सुरू आहेत. यावरून आणि २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर आम्ही रामराज्य आणू म्हणणाऱ्या भाजपालाही यावेळी आव्हाडांनी टोला लगावला आहे.

आव्हाडांचे ट्विट –
“युतीनं आता सरळ रामाच्या पादुका आणून मुख्यमंत्र्याच्या सिंहासनावर ठेवाव्या व राज्य कारभार करावा, नाहीतरी रामराज्यच आणायचे आहे.”

दरम्यान, राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार असा दावा करीत भाजपाने शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १३ मंत्रीपदांची ऑफर दिली आहे. तर मुख्यमंत्रिपदासह गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही खाती कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडेच राहतील असेही भाजपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.