शैक्षणिक आदानप्रदान व प्रसार होणार

प्रशांत देशमुख लोकसत्ता

वर्धा : येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने शैक्षणिक आदानप्रदान करण्याच्या हेतूने जगातील बारा देशांशी करार करीत हिंदी प्रसाराचा मार्ग प्रशस्त केला आहे.

१० जानेवारी हा विश्व हिंदी दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. हिंदी आंतरराष्ट्रीय भाषेच्या स्वरूपात सक्षम व्हावी म्हणून विविध कार्यक्रमाचे आयोजन या निमित्ताने केले जाते. या विद्यापीठातून शिकून आपल्या देशात परतलेले विद्यार्थी उत्साहात हा दिवस त्यांच्या देशात साजरा करतात. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू हनुमानप्रसाद शुक्ल यांनी विद्यापीठाच्या प्रसाराबाबत ‘लोकसत्ता’ला माहिती देताना विविध उपक्रम नमूद केले.

विद्यापीठात के. कुमारस्वामी यांच्या नावावर भारतीय संस्कृती व भाषेचे एक आंतरराष्ट्रीय केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विविध देशातील भारतीय संस्कृती व हिंदी केंद्र या माध्यमातून उपक्रमांचे आयोजन करते. विदेशी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विद्यापीठाने बारा देशांशी करार केले आहे. श्रीलंका, हंगेरी, मॉरिशस, जपान, बेल्जीयम, इटली, जर्मनी, चीन, रशिया, फ्रोन्स, सिंगापूर, केनिया या देशांशी झालेल्या करारांतर्गत विद्यार्थ्यांचे आदानप्रदान होत असते. अनेक विदेशी विद्यार्थ्यांनी भारतीय साहित्यावर पीएच.डी. करीत संशोधनाचे नवे पदर उलगडले. परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने हे कार्यक्रम होतात. हिंदीच्या अशा प्रसाराच्या पार्श्वभूमीवर हिंदी संमेलनाचे आयोजन केले जाते.

विश्व हिंदी दिन सर्वप्रथम १० जानेवारी २००६ रोजी साजरा करण्यात आला. तसेच १९७५ पासून विश्व हिंदी संमेलनाच्या पहिल्या आयोजनानंतर आजवर इंग्लंड, त्रिनिनाथ, अमेरिका, मॉरिशस व अन्य देशात या संमेलनाचे आयोजन झाले आहे.