धवल कुलकर्णी

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा प्रयोग वाटतो तितका सोपा नाही याची प्रचिती म्हणजे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या पक्षांतर्गत बंडाळ्या. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा न मिळाल्याने नाराज होऊन दिलेल्या राजीनाम्यामुळे औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. जिल्हा परिषदेतल्या सत्ता वाटपाबाबत सुद्धा सत्तार नाराज असल्याचे सांगितले जाते.

राज्यामध्ये जरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडीचा प्रयोग केला असला तरीही हा विचार खालपर्यंत जिरवायला वेळ लागेल आणि हा प्रयोग स्थानिक पातळीवर वाटतो तितका सोपा नाही याची प्रचिती या निवडणुकांमधून येते.

गेली अनेक वर्ष किंवा दशकं शिवसेनेचे नेते, मधल्या फळीतले पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे स्थानिक राजकारणात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. राजकारणात विचार आणि निष्ठा चंचल असल्या तरीसुद्धा या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये झालेल्या या प्रकारामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेते हे खऱ्या अर्थाने मनाने एक आले नाहीत याचं हे लक्षण आहे. याच मनभेदांचा फायदा घ्यायला भारतीय जनता पक्ष टपून बसला आहे. मग भलेही महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांच्या स्थानिक पातळीवरच्या लाथाळ्या असोत किंवा सावरकरांबाबत काँग्रेसच्या नेत्यांकडून वारंवार होणारी विधानं.

तिन्ही पक्षांमध्ये संबंध हे ताणले गेलेले असून एकूणच मुत्सद्दीपणाच्या अभावामुळे स्थानिक पातळीवर त्यांची वीण असलेलीच आहे, असे या ‘मिनी मंत्रालयाच्या’ निवडणुकांमध्ये बिघडलेल्या गणितावरून दिसून येते. सांगलीमध्ये जिल्ह्यातले शिवसेनेचे एकमेव आमदार अनिल बाबर यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. तर सोलापूरमध्ये शिवसेनेच्या बळावर भाजपाचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून आले.

खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या निर्णयाचं समर्थन केलं. “मागच्या वेळेस ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र होती. भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर माझा मुलगा सुहास बाबर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाला. महाविकास आघाडीची संख्या जुळून येणं मुश्कील वाटत होतं,” असं बाबर म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपण पाठिंबा द्यावा असा कुठलाही आदेश आपल्याला पक्षाकडून मिळाला नव्हता असा दावा त्यांनी केला.

बाबर यांचं नाव संभाव्य मंत्री म्हणून घेण्यात येत होतं. परंतु त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी घेतलेला निर्णय हा याच्याशी निगडित आहे का असे विचारले असता बाबर म्हणाले “वक्त से पहिले और किस्मत से ज्यादा कुछ नही मिलता.” मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता समक्ष भेटून बोलू असं ते म्हणाले.