नगर परिषद कामकाजविषयक कायद्याबाबत अज्ञानामुळे नगर परिषदेतील विरोधी महाविकास आघाडीच्या सदस्यांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. पण नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनी प्रस्तावित विषयांना सर्वाची मान्यता असल्याचे सांगत ऑनलाईन पद्धतीच्या सभेची सांगता केली.

शहरात शौचालय बांधण्यासाठी नगराध्यक्षांनी ५८/२ या कलमाचा वापर केला होता. त्याविरोधात महाविकास आघाडीचे नगरसेवक सभागृहात ठराव मांडत असताना नगराध्यक्षांनी सभा संपल्याचे जाहिर केल्यामुळे महाविकास आघाडीचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरत नगराध्यक्ष मनमानी करत असल्याचा आरोप केला. तसेच या कलमाचा वापर झालेल्या कामांचे बील देऊ  नका, असे लेखी निवेदन मुख्याधिकाऱ्यांना महाविकास आघाडीकडून देण्यात आले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेची ऑनलाईन सभा घेण्यात आली. कोवीड १९च्या साथीचे नियंत्रण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून शहरातील नागरिकांसाठी जनजागृती करणे, स्वच्छतेचे साहित्य खरेदी करणे व नगरसेवकांच्या मागणीप्रमाणे शहरामध्ये विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्याचा विषय सदस्यांपुढे ठेवण्यात आला. नगराध्यक्षांनी ५८/२ या कलमाचा वापर करून ही सर्व कामे तातडीने केली होती. प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांनी हा विषय मांडल्यानंतर नगरसेवक अविनाश केळस्कर यानी या विषयावर चर्चा करायला सुरवात केली. त्यावर मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते म्हणाले की, या कलमचा वापर करून केलेल्या कामांवर चर्चा करता येत नाही किंवा ठरावही करता येत नाही.

केवळ ही कामे सभागृहाला अवगत व्हावी. यासाठी हा विषय मांडण्यात आला आहे. तरीही महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी चर्चेचा हट्ट धरला.

विषय पत्रिकेवर असलेल्या चार विषयांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वाचन केल्यानंतर नगराध्यक्षांनी या विषयांना सर्वानुमते मंजुरी असल्याचे सांगत सभा संपल्याचे जाहिर केले. राष्ट्रगीत संपल्यानंतर शिवसेनेचे सर्वच नगरसेवक मुख्याधिकारी यांच्या दालनात आले. त्यांनी नगराध्यक्षांच्या या कृतीवर नाराजी व्यक्त करत ५८/२ कलमाचा वापर करून झालेल्या कामांचे बील देऊ  नका, आमचा आक्षेप असल्याचे सांगितले. सभा सुरू असताना मुख्याधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करायला हवे होते. अशी अपेक्षा काहींनी व्यक्त केली.

आम्ही ठराव मांडत असताना नगराध्यक्षांनी सभा संपवली. नगराध्यक्षा मनमानी करत आम्हाला बोलण्याची संधी देत नाहीत. आमची मुस्कटदाबी करत आहेत. ही त्यांची दादागिरीच आहे, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या सदस्य सफा गोटे यांनी नोंदवली. तर  भूमिका स्पष्ट करताना नगराध्यक्ष खेराडे म्हणाल्या की, अर्थसंकल्पाचे पूर्ननियोजन करा अशी सूचना केल्यानंतर मी आज सभागृहात प्रत्येकाला पाच मिनिटे बोलण्याची संधी दिली होती. तेव्हा कोणीच काही बोलले नाही. ५८/२ च्या विषयावर ठराव मांडता येत नाही. असे असताना चुकीच्या पद्धतीने महाविकास आघाडीचे नगरसेवक चर्चेची मागणी करत होते. त्यामुळे पुढील विषयांचे वाचन करून त्यांची मंजूरी घेत सभा संपवली.