राज्यामध्ये सध्या औरंगाबादच्या नामांतरणावरुन महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र दिसत आहे. अशाच बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना मुख्यमंत्री कार्यलयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला. त्यामुळे या नामांतरणाच्या वादाला नव्याने तोंड फुटलं आहे. मात्र ट्विटमध्ये औरंगाबादऐवजी संभाजीनगर उल्लेख झाल्याप्रकरणी आता स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यास काँग्रेसकडून उघडपणे विरोध केला जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य काँग्रेस नेत्यांकडून या मुद्यावरून शिवसेनाला सूचक इशाराही देण्यात आलेला आहे. मात्र असे असतानाही मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटमध्ये काँग्रेस नेते व वैद्यकीय शिक्षण संस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या खात्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी, करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये अमित देशमुख यांचा फोटो देखील वापरण्यात आलेला आहे.

याचसंदर्भात टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “कधी कधी टायपिंग एरर असते किंवा एखाद्या व्यक्तीने लिहून दिलेलं असतं. त्यामुळे चूक होऊ शकते. त्यामुळे हे ट्विटर अकाऊंट हॅण्डल करणाऱ्याला समज देण्यात येईल. मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा मी मंत्री म्हणून ट्विटरचं अकाऊण्ट हॅण्डल करत नाही. ज्या ट्विटर हॅण्डल करणाऱ्याकडून चूक झालीय त्याला समज देण्यात येईल,” असं शेख यांनी सांगितलं आहे.

दरम्यान सायंकाळी ६ वाजून ६ मिनिटांनी हे ट्विट करण्यात आल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा औरंगाबादच्या नामांतरणासंदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी तीन ट्विट केले. यामध्ये त्यांनी, “महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे,” असं म्हटलं आहे.

बाळासाहेब थोरात यांनी यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. “माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये. सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही,” अशा शब्दांमध्ये थोरात यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

तीन ट्विटपैकी शेवटच्या ट्विटमध्ये थोरात यांनी, “छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया,” असंही म्हटलं आहे.

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने शहराच्या नामांतरणाचा विषय पुन्हा तापल्याचे राजकीय तज्ज्ञ मंडळी सागतात. ठाकरे सरकारनेही याच पार्श्वभूमीवर हलचाली सुरु केल्या आहेत. मात्र राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसकडूनच नामांतरणाला विरोध असल्याने विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाला निवडणुकीच्या तोंडावर आयता मुद्दा मिळाल्याचेही चित्र दिसत आहे.