संतोष मासोळे

सांगली, जळगाव महापालिकेत यशस्वी झालेला प्रयोग आता धुळे महापालिकेत राबवून भाजपला पायउतार करण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. जळगाव महापालिकेत केवळ १५ सदस्य असताना शिवसेनेने भाजपच्या नाराजांना गळाला लावून सत्तांतर घडवून आणले. धुळे महापालिकेत महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील नाराजांना हेरून महाविकास आघाडी पुन्हा तो प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. त्या अनुषंगाने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

जळगावप्रमाणे धुळे महापालिका भाजपच्या हातून खेचून घेण्याचा चंग महाविकास आघाडीने बांधल्याचे राजकीय घडामोडींवरून उघड होत आहे. अलीकडेच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची एमआयएमचे आमदार फारुक शाह यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी झालेली भेट आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलेला धुळे दौरा त्याचे निदर्शक ठरले. दोन महिन्यांनी धुळे महापौर पदाची मुदत संपत आहे. यावेळी भाजपला धक्का देण्यासाठी आघाडीतील नेते कामाला लागल्याचे सांगितले जाते. डिसेंबर २०१८ मध्ये धुळे महापालिकेची निवडणूक झाली. माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार जयकुमार रावल आणि माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार सुभाष भामरे या त्रयींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तेव्हा राज्यात भाजपची सत्ता होती. त्यामुळे विरोधी पक्षातील नगरसेवक तसेच नेत्यांना भाजपमध्ये आणणे सुलभ ठरले. सर्व शक्ती पणाला लावून भाजपने ७४ पैकी ५० जागा जिंकून एकहाती सत्ता प्रस्थापित केली. शिवसेना दोन, राष्ट्रवादी काँग्रेस नऊ, काँग्रेस पाच, एमआयएम दोन, समाजवादी पक्ष दोन, बसपा एक, लोकसंगाम एक आणि दोन अपक्ष असे विरोधी नगरसेवक निवडून आले. बहुमतासाठी ३८ चा आकडा प्राप्त होणे आवश्यक आहे. भाजपकडे पूर्ण बहुमत असून या पक्षातील अंतर्गत नाराजी, अस्वस्थतेचा लाभ उठविण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.

भाजपच्या सत्ता स्थापनेनंतर अवघ्या दोन, तीन महिन्यांत पक्षांतर्गत कुरबुरी सुरू झाल्या होत्या. काही नेत्यांच्या मर्जीतील लोकांनाच कामे दिली जातात, त्यांचीच कामे होतात, असा नाराजीचा सूर भाजपच्या विशिष्ट नगरसेवकांमधून उमटू लागला. सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांनी मनपाच्या कारभाराविरोधात अनेकदा आंदोलने केली आहेत. एका विशिष्ट नेत्याच्या कार्यालयात हजेरी लावणाऱ्या नगरसेवकांनाच पदे मिळत असल्याची तक्रार भाजपमधील अनेक नगरसेवकांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली होती. विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी येऊनही निधी वाटपात दुजाभाव होत असल्याची अनेकांची ओरड आहे. महापालिकेत सत्ता मिळवताना पिण्याच्या पाण्यासह पायाभूत सुविधांचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, त्यांची पूर्तता झालेली नाही. शहरातील अनेक रस्ते खोदून ठेवलेले आहेत. या समस्यांनी नागरिक त्रस्त असून त्यांच्या नाराजीला भाजप नगरसेवकांना तोंड द्यावे लागत आहे. निवडणुकीआधी शहरालगतच्या ११ गावांचा धुळे महापालिकेत समावेश करण्यात आला. त्या गावांमधून निवडून आलेल्यांची कामे होत नसल्याने त्यांच्यात अस्वस्थता आहे.

सत्ताधारी पक्षात नाराज नगरसेवकांचा मोठा गट आहे. त्यांना गळाला लावण्याची चाचपणी पालकमंत्री सत्तार, काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, अनिल गोटे, शिवसेनेचे हिलाल माळी हे करीत असल्याचे सांगितले जाते. गनिमी काव्याने तयारी सुरू असल्याने आघाडीतील नेते जाहीर वाच्यता करणे टाळतात.

पालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते कमलेश देवरे यांनी महापौर निवडणुकीत तशी संधी मिळाली तर त्यादृष्टीने नक्कीच प्रयत्न केले जातील, असे सूचक विधान केले आहे. जळगावचे उदाहरण समोर असल्याने सत्ताधारी भाजपला धुळे महापालिकेत अधिक खबरदारी घेण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.

धुळे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक एकजूट आहेत. काहींची नाराजी असेलही, पण, धुळे शहरात जळगावप्रमाणे परिस्थिती उद््भवणार नाही. भाजपचे नगरसेवक हे एकदिलाने काम करीत आहेत. धुळे शहरात जोमाने विकासकामे सुरू आहेत. यामुळे महापालिकेत जळगावसारखी परिस्थिती कधीच होणार नाही, याची १०० टक्के खात्री आहे.

-अनुप अग्रवाल, महानगर अध्यक्ष, भाजप, धुळे