04 July 2020

News Flash

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मानले महाराष्ट्राचे आभार

संग्रहित फोटो

देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून महाराष्ट्रातील जनता, मंत्रिमंडळातील सहकारी आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. उद्धव ठाकरे यांनी निवेदन देत हे आपल्या एकट्याचं यश नसून राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचं यश असल्याची भावना व्यक्त केली आहे.

देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आयएएनएस आणि सी व्होटर्स या संस्थेने संयुक्तरित्या सर्व्हेक्षण केलं. या सर्व्हेक्षणातील आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता ७६.५२ टक्के आहे. यासोबत उद्धव ठाकरे यांचा समावेश देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये झाला आहे.

उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं आहे –
लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझा समावेश झाला हे माझे एकट्याचे यश नाही. सहा महिन्यांच्या काळात शिवरायांचे हे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश आहे. मुख्यमंत्रीपद हे निमित्त आहे. महाराष्ट्राची सेवा घडत आहे हे महत्त्वाचे. लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल हेच माझे ध्येय आहे.

महाराष्ट्राच्या जनतेने संकट काळात विश्वास दाखवला. माझे मंत्रिमंडळातील सहकारी, सर्व अधिकारी या सर्वांचे आभार. अर्थात तमाम शिवसैनिकांचे प्रेम व शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेबांचा आशीर्वाद याशिवाय ही झेप शक्य नाही अशी भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

आयएएनएस आणि सी व्होटर्सने देशभारातील वेगवेगळ्या राज्यांमधील जनतेकडून राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील नेत्यांच्या लोकप्रियतेबद्दल जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर बहुतांशी मतदारांनी शिक्कामोर्तब केलं. ६६.२० टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांना पसंती दर्शवली तर २३.२१ टक्के लोकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पसंत असल्याचे म्हटले आहे. याच सर्वेक्षणामध्ये देशातील मुख्यमंत्र्यासंदर्भातही काही प्रश्न विचारण्यात आले. ज्यामाध्यमातून राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या सर्वेक्षणानुसार बिजू जनता दलाचे (बीजेडी) अध्यक्ष आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. ८२.९६ टक्के लोकांनी पटनायक यांच्या कामाबद्दल समाधानी असल्याचे म्हटलं आहे. त्या खालोखाल दुसऱ्या स्थानावर छत्तीसगडमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (८१.०६ टक्के), तिसऱ्या स्थानावर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (८०.२८) यांचा समावेश आहे. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानावर असण्याचा मान व्हायएसआर काँग्रेसचे प्रमुख तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (७८.५२ टक्के) यांना मिळाला आहे. तर पाचव्या स्थानावर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे यांना ७६.५२ टक्के मते मिळाली आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अऱविंद केजरीवाल यांचे नाव असून त्यांची लोकप्रियताही उद्धव ठाकरेंपेक्षा कमी आहे. केजरीवाल यांना ७४ टक्के मते आहेत. सर्वाधिक पसंती असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये पहिल्या सहामध्ये केंद्रात सत्ता असणाऱ्या भाजपाशासित राज्याच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 1:08 pm

Web Title: mahavikas aghadi shivsena cm uddhav thackeray reaction after making in list of favorite chief ministers sgy 87
Next Stories
1 “करोनाच्या भीतीने मी आत्महत्या करतोय”, बीडमध्ये ६५ वर्षीय वृद्धाने सुसाईड नोट लिहून घेतला गळफास
2 मोदी सरकार ट्रम्प यांचे स्वागत करण्यात गुंग होते, तेव्हा…; राहुल गांधींना ट्रोल करणाऱ्यांना आव्हाडांनी सुनावलं
3 लॉकडाउनने ‘हे’ शिकवलं तर सार्थक झालं – राज ठाकरे
Just Now!
X