जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. या हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले होते. आज या भीषण हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शहीद जवांनांना देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे. मात्र त्याच वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या हल्ल्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत या हल्ल्याची चौकशी करुन सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी केली. दोन्ही काँग्रेसने केलेल्या या मागणीवरुन आता शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे. मात्र दोन्ही काँग्रेसने पुलवामा हल्ल्यासंदर्भात विचारलेले प्रश्न हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षभरापूर्वी घेतलेल्या भूमिकेशी विसंगीत साधणारे आहेत. त्यामुळेच आता पुलवामा प्रकरणावरुन राज्यातील महाविकास आघाडीत बिघाडीची ठिणगी पडण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

काँग्रेसची भूमिका काय?

काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात तीन प्रश्न उपस्थित करत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. पुलवामा हल्ल्याला एक वर्ष झाल्यानिमित्त राहुल गांधींनी या हल्ल्यात शहीद जवानांच्या शवपेट्यांचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये राहुल यांनी तीन प्रश्न विचारले आहेत. “आज आपण पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या ४० शहीद जवांनाच्या हौतात्माचे स्मरण करत आहोत. त्यानिमित्त आपण काही प्रश्न विचारायला हवेत… १) या हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?, २) या हल्ल्याच्या तपासामधून काय निष्पन्न झालं? ३) ज्या सुरक्षासंदर्भातील त्रुटींमुळे हा हल्ला झाला त्यासाठी भाजपा सरकारमधील कोणत्या व्यक्तीला जबाबदार धरण्यात आलं?,” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. या मधून त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीचे म्हणणे काय?

पुलवामा हल्ल्याचं सत्य देशाच्या जनतेला जाणून घ्यायचं असल्याने या हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी  पुलवामा हल्ल्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. “पुलवामा हल्ल्यात आपले सीआरपीएफच्या ४० जवानांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात आजपर्यंत आरडीएक्स कुठून आले आणि वाहन घटनास्थळावर कसे पोहोचले याची चौकशी करण्यात आलेली नाही,” असं मत मलिक यांनी व्यक्त केलं. “हल्ल्यात वापरण्यात आलेल्या वाहनाचा वाहन चालक तुरूंगात होता. तो कसा बाहेर आला? लोकांना सत्य जाणून घ्यायचे असेल म्हणून चौकशी केली पाहिजे,” अशी मागणी मलिक यांनी केली आहे. “लोकसभा निवडणुकीदरम्यान या विषयावरुन राजकारण करण्यात आले मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली नाही,” असा आरोपही मलिक यांनी केला आहे.

वर्षभरापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावर १४ फेब्रुवारी २०१९ रोजी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. “केंद्र सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले पाहिजे. एकदाच पाकिस्तानचा सोक्ष मोक्ष लावून टाका,” असं यावेळी उद्धव म्हणाले होते. गुप्तचर यंत्रणांनी हल्ल्यापूर्वी इशारा देऊनही हल्ला होतो. मग अधिकारी नेमके काय करत होते, ज्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी उद्धव यांनी केली होती. “नुसत्या घोषणा देऊन किंवा दंड थोपटून काहीही होणार नाही. आता या विषयाचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे. आता पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले पाहिजे. शांत बसणे मर्दानगी नव्हे. या आधी झालेल्या सर्जिकल स्ट्राइकचा अभिमान आहे. मात्र तो सर्जिकल स्ट्राइक आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये केला होता. ती लोकं आपल्या देशात घुसून घातपात घडवत आहे. जनतेच्या मनात संताप असून जनता सरकारच्या पाठिशी आहे, सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून धडा शिकवला पाहिजे,” असेही त्यांनी यावेळी म्हटले होते.

त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्यानंतर जनता सरकारच्या पाठीशी असल्याचे म्हटले होते तर आता राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये मित्र पक्ष असणाऱ्या दोन्ही काँग्रेसने जनतेला सरकारकडून उत्तर हवे आहे अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळेच यावरुन आता शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.