|| नितीन पखाले

महाविकास आघाडीची कोंडी; भाजप लाभ उठविण्याच्या प्रयत्नात

यवतमाळ : यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ‘आयात’ उमेदवाराचा मुद्दा पेटला आहे. महाविकास आघाडीने स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलून उमेदवार दिल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्येही धुसफुस सुरू आहे. त्यातूनच या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

या मतदारसंघाचे सदस्य आमदार तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडून तत्कालीन विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया आणि काँग्रेसकडून शंकर बडे रिंगणात होते. आघाडीतील या फुटीचा पूर्ण फायदा त्या वेळी शिवसेना, भाजपने उचलला. तानाजी सावंत यांनी आघाडीतील मते फोडून मोठय़ा फरकाने विजय मिळवला होता. मात्र आता या निवडणुकीचे सर्व संदर्भ बदलले आहेत.

शिवसेनेने विधान परिषदेत महाविकास आघाडीचा प्रयोग करून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांना विश्वासात घेऊन नागपूर येथील काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. दुष्यंत यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळेच शिवसेनेतील अनेक निष्ठावंत दुखावले आहेत. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार यांनी बंड करून अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांच्या या निर्णयाला शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेल्यांचे पक्षाच्या विकासात योगदान काय, असा प्रश्न मुनगीनवार यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेचे स्थानिक नेते आणि जिल्हाप्रमुखांनी सावध पवित्रा घेतला आहे. शिवसेनेचे नेते वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी या विषयावर काहीही प्रतिक्रिया अद्याप व्यक्त केली नाही. दुष्यंत यांची उमेदवारी दाखल करण्यापूर्वी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर हे दोन दिवस यवतमाळात तळ ठोकून होते. त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दुष्यंत हेच निवडून आले पाहिजे, अशा सूचना केल्या.

शिवसेनेलाच नव्हे तर महाविकास आघाडीलाही बंडखोरीचे ग्रहण या निवडणुकीत लागले आहे. काँग्रेसचे पांढरकवडाचे माजी नगराध्यक्ष शंकर बडे, राष्ट्रवादीचे संजय देरकर, पूर्वी शिवसैनिक असलेले व सध्या राष्ट्रवादीत असलेले राजू दुधे, नूर मोहम्मद आणि सर्वच पक्षांसोबत सौहार्दाचे संबंध असलेले उद्योजक दीपक निलावार यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. संजय राठोड यांच्या दिग्रस मतदारसंघातील दिग्रस नगर परिषदेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही दुष्यंत चतुर्वेदी यांना मदत न करता नूर मोहम्मद या अपक्षाच्या अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी केली आहे; परंतु स्थानिक अस्मितेचा मुद्दा पुढे करून अपक्षांनीही एकीची मोट बांधली आहे. शुक्रवारी १७ जानेवारीला नामांकन अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने अपक्षांच्या या बैठकीत काय ठरते, याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेने उमेदवार आयात केल्याची टीका होत असताना महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपने जो उमेदवार दिला त्यांची कौटुंबिक पाश्र्वभूमी ही राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचे म्हटले आहे. भाजपने कंत्राटदार सुमित बाजोरिया यांना रिंगणात उतरवले आहे. सुमित यांचे ज्येष्ठ बंधू संदीप बाजोरिया हे यापूर्वी याच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर निवडून गेले होते. त्यामुळे भाजप नेत्यांनी बाहेरच्या उमेदवारावरून महाविकास आघाडीला तात्त्विक सल्ले देऊ  नये, अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे. भाजपने संख्याबळाच्या आधारे ही निवडणूक कशी जिंकता येईल, यासाठी सूक्ष्म नियोजन केले आहे.

‘बंडखोर उमेदवारी मागे घेतील’

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात लढेल असे वाटत नाही. आम्ही बाळासाहेब मुनगीनवार यांच्याशी चर्चा करू. ते आपली उमेदवारी नक्की मागे घेतील, असा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी व्यक्त केली.

मतांचे गणित : निवडणुकीत ४९० मतदार आहेत. जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची २४६ मते हवी आहेत. भाजपकडे १८६ मते असल्याचा दावा केला जात आहे. उर्वरित ६० मतांचे गणित स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांसोबत असलेल्या संबंधाच्या आधारावर जुळून येईल, असा विश्वास भाजपला आहे.