16 February 2019

News Flash

विजेच्या स्थिर आकार शुल्कात एक वर्षांत ५० टक्के वाढ

आयोगाने बारा महिन्यात तीन वेळा स्थिर आकार वाढवला असला तरी तो खूप कमी आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| महेश बोकडे

महावितरणच्या घरगुती आणि वाणिज्यिक ग्राहकांसाठी असलेल्या स्थिर आकार शुल्कात १ एप्रिल २०१८ नंतर तीन वेळ वाढ करण्यात आली असून ती वेगवेगळ्या गटातील ग्राहकांसाठी ५० ते ८८ टक्के आहे.

राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणला २०१६ ते २०२० या चार वर्षांमध्ये चार टप्प्यांमध्ये वीज दरवाढीला मंजुरी दिली होती. त्यानुसार पहिल्या  टप्प्यात जून २०१६ मध्ये, दुसऱ्या टप्यात १ एप्रिल २०१७ मध्ये, तिसऱ्या टप्यात १ एप्रिल २०१८ मध्ये दरवाढ  करण्यात आली. चवथ्या टप्प्यातील दरवाढीपूर्वीच महावितरणने मोठय़ा प्रमाणात खर्च वाढल्याचे सांगत पुन्हा दरवाढीची विनंती आयोगाला केली होती. १२ सप्टेंबर २०१८ ला गणोशोत्सवाच्या तोंडावर दरवाढीचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार घरगुतीच्या सिंगल फेज आणि थ्री फेज वाणिज्यिक ग्राहकांसाठीच्या स्थिर आकारात  मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. १ एप्रिल २०१८ मधील घरगुती  सिंगल फेज ग्राहकांना ६५ रुपये स्थिर आकार होता. १ सप्टेंबर २०१८ च्या वीज देयकात हे दर ८० रुपये झाले. १ एप्रिल २०१९ मध्ये ते  ९०  रुपये होईल.

आयोगाने बारा महिन्यात तीन वेळा स्थिर आकार वाढवला असला तरी तो खूप कमी आहे. वास्तविक महावितरणचा देखभाल, दुरुस्तीवरील खर्च  वाढला आहे. या दरवाढीतून मिळणाऱ्या महसुलामुळे वीज सेवेचा दर्जा आणखी सूधारण्यास मदत होईल.’’   – पी.एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई.

आयोगाने दिलेली दरवाढ कमी असली तरी छुप्या पद्धतीने वाढवलेले स्थिर आकार जास्त आहेत. देशात दिल्ली सरकारने प्रथमच २५ टक्के दर कमी करण्याचा प्रस्ताव तेथील वीज नियामक आयोगाला दिला आहे. त्यामुळे शासनाने तेथील वीज यंत्रणेचा अभ्यास करून हे दर कमी करण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे.’’    – महेंद्र जिचकार, वीज क्षेत्राचे जाणकार, नागपूर.

First Published on September 14, 2018 12:18 am

Web Title: mahavitaran hike of 50 percent in power charges