News Flash

वीज कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी! पगारातून १ दिवसाचा निधी सीएम केअर फंडमध्ये जमा!

करोनाशी लढा देण्यासाठी राज्यातील वीज कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपलं एका दिवसाच वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिलं आहे.

वीज कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केली मदत!

एरवी वीज पुरवठ्याच्या अनियमिततेमुळे नेहमीच लोकांचा त्रागा आणि संताप सहन करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श सामान्यांसमोर घालून दिला आहे. आपल्या एका दिवसाचं वेतन या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिलं आहे. गेल्या दीड वर्षापासून राज्यात, देशात आणि जगभरात करोनाचं संकट थैमान घालत आहे. या काळात अनेक सामाजिक संस्था, खासगी क्षेत्रातील कंपन्या आणि वैयक्तिक पातळीवर लाखो लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील वीज विभागाचे कर्मचारी आणि अधिकारीही मागे राहिलेले नाहीत. राज्यातील महावितरण आणि महाऊर्जा या वीज वितरण कंपन्यांमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार करोनाविरोधातील लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केला आहे. या रकमेचा धनादेश आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या एका दिवसाच्या वेतनाचा मिळून हा निधी तब्बल ६ कोटी २० लाखांच्या घरात गेला आहे!

६ कोटी २० लाख ५ हजार ७२१ रुपयांचा निधी!

सह्याद्री अतिथिगृहात हा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आला. यात महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या एक दिवसाच्या वेतनातून पाच कोटी १७ लाख ३४ हजार ६५० रुपये तर महानिर्मितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाच्या वेतनातून १ कोटी २ लाख ७१ हजार रुपयांचे योगदान एकत्रित करण्यात आले. हे योगदान धनादेशाच्या रुपात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ साठी देण्यात आले आहे. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांची कौतुकाची थाप

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महावितरण आणि महानिर्मितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची या योगदानाबद्दल प्रशंसा केली. “कोविड-१९ च्या संकटात हे सर्व अधिकारी, कर्मचारी वीज पुरवठा अखंडीत रहावा यासाठी आव्हानात्मक परिस्थितीतही सदैव सज्ज राहिले आहेत. यातूनही त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याची संवेदनशीलता दाखविली आहे, जी कौतुकास्पद आहे”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-19

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-19 साठी राज्य सरकारकडून स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 6:59 pm

Web Title: mahavitaran mahaurjaa mahadiscom workers one day salary for cm care fund covid 19 pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्र आघाडीवर! अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण, दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ५० लाखांवर
2 उद्धव ठाकरे-मोदी वैयक्तिक भेटीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
3 “नाक्यावर उभे राहणारे टपोरीही स्वत:ला वाघ समजतात”, संजय राऊतांच्या विधानावर भाजपाचा निशाणा!
Just Now!
X