सहा हजार कोटींच्या दरवाढीचा प्रस्ताव, सामान्य ग्राहकांना फटका, बडय़ांना दिलासा

सध्या महागाईची झळ सोसत असलेल्या मध्यमवर्गावर आता ‘महावितरण’च्या दरवाढीचीही वीज कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईतील पूर्व उपनगरांसह संपूर्ण राज्यभरात वीजपुरवठा करणाऱ्या ‘महावितरण’ने ५९२७ कोटी रुपयांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केला आहे.

राज्यातील सुमारे दोन कोटी ५५ लाख वीजग्राहकांना या दरवाढीचा फटका बसणार असून दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या सामान्य घरगुती ग्राहकांचा वीजदर हा ८ टक्क्यांनी वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. ३०० युनिटपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मात्र दरवाढीतून वगळण्याची मागणी महावितरणने केली आहे.

राज्य वीज नियामक आयोगाच्या बहुवार्षिक वीजदर पद्धतीनुसार इतर वीजवितरण कंपन्यांसह महावितरणनेही आता २०२० ते २०२५ या पाच वर्षांच्या काळासाठी वीजदरवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे दाखल केला. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळासाठी ५.८० टक्के, २०२१-२२ मध्ये ३.२५ टक्के, २०२२-२३ मध्ये २.९३ टक्के, २०२३-२४ मध्ये २.६१ टक्के तर २०२४-२५ मध्ये २.५४ वीजदरवाढीचा प्रस्ताव महावितरणने दाखल केला आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्यातील सर्व महसुली मुख्यालयांच्या शहरांत महावितरणच्या प्रस्तावावर सुनावणी होईल. त्यात ग्राहक संघटनांना व इतरांना हरकती घेता येतील. सध्याच्या वीजदरातून महावितरणला ७६ हजार ९९८ कोटी रुपयांचा महसूल मिळतो. नवीन वीजदर लागू झाल्यानंतर ८२ हजार ९२५ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित असून ही दरवाढ ५९२७ कोटी रुपयांची म्हणजेच सरासरी ५.८० टक्के असेल. त्यामुळे आता राज्य वीज नियामक आयोग प्रत्यक्षात किती दरवाढ मंजूर करतो याकडे लक्ष असणार आहे.

प्रस्ताव काय?

* दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या सामान्य घरगुती ग्राहकांचा वीजदर ३.०५ रुपये प्रति युनिट असून तो ३.३० रुपये करावा

* १०१ ते ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांचा दर ६.९५ रुपयांवरून ७.३० रुपये करावा.

* ३०१ युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या बडय़ा घरगुती ग्राहकांचा वीजदर कायम ठेवण्यात यावा.

* कृषिपंपांचा वीजदर ५ टक्क्यांनी वाढवण्याचा तर यंत्रमागधारकांचा वीजदर ४ ते ५ टक्क्यांनी वाढवण्याचा महावितरणचा प्रस्ताव आहे.

* रेल्वे-मेट्रो-मोनो आदींचा वीजदर १० टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

* घरगुती वीजग्राहकांचा स्थिर आकार दरमहा ९० रुपयांवरून ११० रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे.