राष्ट्रवादी काँग्रेसकडून अलिबाग विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या महेश मोहिते यांनी मंगळवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मोहिते यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे तर्कवितर्काना ऊत आला आहे. येत्या दोन-चार दिवसांत पुढील राजकीय वाटचालीबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 पक्षाचे धोरण आणि पक्षाची भूमिका यात प्रचंड विसंगती असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पक्षाची ठोस भूमिका मांडण्यात अपयशी ठरले असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शेकापशी युती करणे हा चुकीचा निर्णय होता. त्यामुळे पक्षाची विश्वासार्हता पणाला लागली. जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि पक्षाच्या उमेदवारांना मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागले.
दुसरी गोष्ट म्हणजे विधानसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निवडणुकीनंतर कारवाई होणे अपेक्षित होते; पण तसे झाले नाही. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर तटकरे यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली, असेही मोहिते यांनी सांगितले.
पक्षाची भूमिका आणि पक्षाचे धोरण यात कमालीची विसंगती आहे. त्यामुळे माझ्यासारख्या उदयोन्मुख कार्यकर्त्यांला येथे काम करणे शक्य नाही. अशा वेळी नेतृत्वात बदल करणे अथवा पक्षाचे धोरण बदलणे हे दोन पर्याय माझ्यासमोर होते. पक्षाचे धोरण बदलण्याएवढा मी मोठा कार्यकर्ता नाही. त्यामुळे यातील आपले नेतृत्व बदल करण्याचा निर्णय मी घेतला आहे. येत्या दोन-चार दिवसांत पुढील राजकीय वाटचालीबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
  गेली १० वर्षे पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम मी केले. या कामात सुनील तटकरे यांनी मला खूप सहकार्य दिले. त्यांचे प्रोत्साहनही मिळाले; पण अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला स्थान राहिले नाही. त्यामुळे पक्षापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या १३ पदाधिकाऱ्यांनी पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे सादर केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजीनामा देणाऱ्यांमध्ये तालुका उपाध्यक्ष परशुराम म्हात्रे, राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे अध्यक्ष शौकीन राणे, भूषण शहासने, अनिता पाटील, जनार्दन भगत, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष मजाहीद मोमीन, अलंकार पाटील, नितीन म्हात्रे, राजू जाधव, विजय पाटील, जगन्नाथ पाटील आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे मोहिते यांनी स्पष्ट केले.
मोहिते भाजपच्या वाटेवर
आगामी राजकीय वाटचालीबद्दल येत्या दोन-चार दिवसांत निर्णय घेणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले असले तरी भाजपसोबत बोलणी सुरू असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना मान्य केले. पक्षातील ज्येष्ठ नेते संपर्कात असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही मोहिते यांनी या वेळी सांगितले.