राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून लसीकरणासंबंधी एक महत्वाची मागणी केली आहे. २५ वर्षांपुढील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या मागणीला महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांनीदेखील पाठिंबा दर्शवला आहे.

२५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची परवानगी द्या; मुख्यमंत्री ठाकरेंची मोदींकडे महत्वाची मागणी

करोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून, आता या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचविणे आवश्यक आहे, त्यामुळे २५ वर्षांपुढील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या अगोदर उद्धव ठाकरेंनी ४५ वर्षांपुढील सर्वांना लस दिली जावी अशी मागणी केली होती, ती पंतप्रधान मोदींनी मान्य केली होती. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे पत्रात आभार व्यक्त केले असून, लसीकरणाचा वयोगट आणखी कमी करावा, अशी विनंती केली आहे. याशिवाय लसींचा पुरवठा देखील वाढण्याची मागणी केली आहे. तरूण वर्ग मोठ्यासंख्येने कामासाठी घराबाहेर पडत असतो, जर त्यांना लसीकरण झाले तर रूग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

दरम्यान आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.

आनंद महिंद्रांनी आभार मानताना काय म्हटलं आहे –
लॉकडाउन लागू न केल्याबद्दल आभार मुख्यमंत्री कार्यालय…सतत संघर्ष करणाऱ्या छोट्या दुकानदारांसाठी मला वाईट वाटत राहतं. आता या करोनासंबंधित नियमांचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे जेणेकरुन ही बंधनं लवकरात लवकर किंवा त्यानंतर मागे घेतली जातील.

उद्धव ठाकरेंनी लगावला होता टोला-
उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना नाव न घेता आनंद महिंद्रांना टोला लगावला होता. “मी त्यांचं नाव घेणार नाही, पण एका उद्योगपतीने सांगितलं की लॉकडाऊन करायचाय, तर आरोग्य सुविधा वाढवा. ते आपण करतोच आहोत. गेल्या वर्षभरात आपण आरोग्य सुविधा वाढवली, अजूनही वाढवतो आहोत. पण हे जे काही आपल्याला सल्ले देत आहेत, ज्या उद्योगपतींनी आरोग्य सुविधा वाढवायला सांगितलं, त्यांना मी हात जोडून सांगू इच्छितो, की आरोग्य सुविधा आपण वाढवतोच. पण कृपा करून रोज मला किमान ५० डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांची महाराष्ट्रात पुरवठा होईल, अशी काहीतरी सोय करा. कारण नुसरं फर्निचरचं दुकान म्हणजे हॉस्पिटल नाहीत”, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.