बुधवापर्यंत पोलीस कोठडी

अकोल्यात उघडकीस आलेल्या व राज्यभर जाळे असलेल्या किडनी तस्करी प्रकरणात अकोला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आज, रविवारी तिसऱ्या आरोपीला बुलडाणा जिल्ह्य़ातून अटक केली. त्याला न्यायालयाने ९ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. नागपूर आणि औरंगाबाद येथील ताब्यात असलेल्या डॉक्टरांची चौकशी करून सोडण्यात आले आहे.
अकोल्यातील शिवाजीनगर येथील आनंद भगवान जाधव (३०) याने संतोष शंकर गवळी यांना व्याजाने २० हजार रुपये दिले होते. कर्जफेड करता न आल्याने आनंद जाधव याने गवळीला किडनी विकण्यास भाग पाडले. या प्रकरणातील देवेंद्र शिरसाट याने गवळीचे तत्काळ सांगली जिल्ह्य़ातील इस्लामपूरच्या शिवाजी कोळीशी भेट घडवली. शिवाजी कोळीने गवळीला यवतमाळ येथील डॉ. मंगला आणि डॉ. सुहास श्रोत्री दाम्पत्याकडे आणले. नागपुरातील एका डॉक्टरच्या सहाय्याने संतोष गवळीच्या नागपूरमध्ये तपासण्या करून गवळीला श्रीलंकेत नेण्यात आले. कोलंबोत किडनी काढण्यात आली. त्यासाठी गवळीला ३ लाख रुपये देऊ न त्याची फसवणूक करण्यात आली. देवेंद्र शिरसाट व आनंद जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
या प्रकरणातील आणखी एक आरोपी असलेला बुलढाणा जिल्ह्य़ातील देऊळगावराजा तालुक्यातील मांडवा गावातील विनोद पवार याला आज पोलिसांनी त्याच्या गावातून अटक केली. त्याला न्यायालयाने ९ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.