सांगली : चौगुले हॉस्पिटलमध्ये गर्भपात करून भ्रूणांची हत्या केल्याप्रकरणी मुख्य संशयित डॉ. विजयकुमार चौगुले याला मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली. पत्नी डॉ. रूपाली शहा यांची न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केल्यानंतर आज सकाळी डॉ. चौगुले पोलिसांना शरण आले. मात्र, या हॉस्पिटलचा नìसग परवाना असलेले डॉ. स्वप्नील जमदाडे अद्याप फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

चौगुले मॅटर्निटी व सर्जकिल हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात करण्यात येत असल्याचा प्रकार चार दिवसांपूर्वी उघडकीस आला. या प्रकरणी चौगुले दांपत्यासह तीन डॉक्टरविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी रात्री श्रीमती चौगुले यांना अटक करण्यात आली. पत्नीला अटक होताच डॉ. विजयकुमार शामराव चौगुले (वय ४५, रा. सिद्धिविनायक नक्षत्र अपार्टमेंट, विश्रामबाग) मंगळवारी सकाळी पोलिसांना शरण आले.

चौगुले हॉस्पिटलवर टाकलेल्या छाप्यात गर्भपाताची किट्स, औषधी गोळ्या, इंजक्शनचा साठा जप्त केला होता. गर्भपात केलेल्या महिलांचे केस पेपर व तसेच आक्षेपार्ह कागदपत्रेही सापडली होती. आतापर्यंतच्या तपासात सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ महिलांचा गर्भपात केल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासामध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

रुग्णालयात गर्भपातासाठी दाखल असलेल्या नऊ महिलांची नावे व पत्त्यावरून त्यांचा शोध घेण्यात आला आहे. या महिलांचे जबाब घेण्यासाठी पोलिसांची चार पथके सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात रवाना केली आहेत. या महिलांनी गर्भपात कधी केला? गर्भपात करण्यामागे काय कारण होते? त्यांना गर्भपातासाठी चौगुले हॉस्पिटलमध्ये कोणी पाठविले? सोनोग्राफी तपासणी कुठे केली? या सर्व बाबींचा उलगडा जबाबातून केला जाणार आहे. याशिवाय संबंधित महिलांच्या पतींनाही चौकशीसाठी बोलावले जाणार आहे.

दरम्यान अटकेतील चौगुले दाम्पत्याची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीतून त्यांनी आतापर्यंत किती महिलांचे गर्भपात केले? गर्भपातासाठी लागणारी औषधे कोठून आणत होते? याचा प्रथम उलगडा केला जाईल, असे पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी सांगितले.

रुग्णालयात दोन महिला व एक पुरुष, असे तीनच कर्मचारी आहेत. त्यांनाही चौकशीच्या फेऱ्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. त्याआधारे पुढील तपासाला दिशा देण्यात आली आहे. गर्भपात करण्यासाठी या महिला कोणाच्या माध्यमातून येत होत्या? यासाठी चौगुले दाम्पत्य किती पैसे घेत होते? याविषयी कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली जात आहे. त्यांचा यामध्ये कितपत सहभाग आहे, हे पाहून पुढील कार्यवाही केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

चौगुले हॉस्पिटल येथे झालेल्या बेकायदा गर्भपात  प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे (स्यूमोटो) दखल घेतली असून जिल्हा पोलीस अधीक्षक यांना या प्रकरणाचा तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल तत्काळ सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत.

महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी हे निर्देश दिले असून या प्रकरणी महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांचा अहवाल आयोगास प्राप्त झाला आहे.