लातूर-निलंगा रस्त्यावर शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एसटी बस- ट्रकची धडक झाली. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर आठ जण जखमी आहेत. गेल्या १५ दिवसांत या मार्गावर झालेला हा तिसरा अपघात आहे. शुक्रवारी रात्री ११.१० वाजता लातूर-हैदराबाद जाणारी एसटी लातूर बसस्थानकावरून निघाली होती.

औशाच्या पुढे आल्यानंतर चलबुर्गा पाटीजवळ ११.५० च्या सुमारास एसटी व ट्रकची धडक झाली. यामध्ये अंकिता अमित भोज यांच्यासह तिघेजण ठार झाले. दोन मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही. तर जखमींमध्ये अमित भोज , दीपक गुंडेवार नाईक, दीपाली नाईक, गिरीश गुंडेवार नाईक, नागनाथ कलप्पा हंसराळे यांचा समावेश आहे. लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी अमित भोज यांची प्रकृती गंभीर आहे. गेल्या पंधरा दिवसांतील हा तिसरा मोठा अपघात आहे. १८ नोव्हेंबरला एसटी-ट्रक अपघातात सात जण ठार झाले होते, तर २६ नोव्हेंबरला कार अपघातात तिघे ठार झाले होते.