राजकारणात अचूक निर्णय घ्यायला तसेच सल्ल्याला मोठे महत्त्व असते. त्याचे प्रत्यंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आले. शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे हे खासदार झाले, तर काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना घरी बसावे लागले.
वाकचौरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीरही केली. सेनेतच राहणार अशी शपथ त्यांनी घेतली. शिवसैनिक हे वाकचौरे यांना सेनेतच रहा, असे सांगत होते. पण माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी त्यांचे मन वळवले. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, आमदार भाऊसाहेब कांबळे या नेत्यांनी त्यांना काँग्रेस प्रवेशाला प्रवृत्त केले. काँग्रेस पक्ष अनेक नेते सोडत असताना वाकचौरे मात्र काँग्रेसच्या डुबत्या जहाजात बसले. अखेर पराभवाला त्यांना सामोरे जावे लागले. काँग्रेसजनांनी त्यांना मनापासून साथ दिली नाही. शिवसेनेत असते तर वाकचौरे यांना मोठे मताधिक्य व वेळप्रसंगी ‘लाल दिवा’ही मिळू शकला असता. पण विनाशकाले विपरीत बुध्दी म्हणतात याप्रकारे त्यांनी चुकीचा निर्णय घेतला. राजकारणातून त्यांना घरी बसावे लागले.
शिवसेनेने माजी मंत्री बबनराव घोलप यांना उमेदवारी दिली, पण शिक्षेमुळे ती रद्द झाली. नंतर घोलप यांचे चिरंजीव योगेश यांना उमेदवारी दिली जाणार होती. पण आमदार अशोक काळे यांनी विरोध केल्याने लोखंडे यांना संधी मिळाली. शिवसेनेतील अंतर्गत मतभेदाचा फायदा लोखंडे यांना उमेदवारी मिळवताना झाला. खरे तर लोखंडे हे लोकसभेचे उमेदवार असतील हे त्यांनाही माहीतही नव्हते. १५ वर्षे आमदार व जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम करताना त्यांची माजी आमदार भानुदास मुरकुटे, आमदार अशोक काळे व सबाजी गायकवाड यांच्याशी असलेल्या मैत्रीचा व संवादाचा फायदा त्यांना खासदारकीपर्यंतच्या प्रवासासाठी लाभदायी ठरला.
शिवसेनेची उमेदवारी वाकचौरे यांनाच मिळणार आहे. काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देईल अशी चर्चा निवडणुकीपूर्वी सुरू होती. मुरकुटे यांनी लोखंडे यांची भेट झाली असता तुम्ही सेनेकडून श्रीरामपूरला विधानसभेची निवडणूक लढवा असा सल्ला लोखंडे यांना दिला. तसेच काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात मदत करण्याचे कबूलही केले. त्यानुसार लोखंडे यांनी विधानसभेची चाचपणी सुरू केली. लोखंडे हे त्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होते. त्यांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी प्रारंभ केला. पण नंतर सारे राजकारण बदलले. वाकचौरे सेनेचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये गेले तेव्हा सेनेकडून उमेदवारी मिळावी म्हणून लहू कानडे, लोखंडे व घोलप हे उत्सुक होते. सेनेचे कार्याध्यक्ष ठाकरे यांनी घोलप यांना उमेदवारी दिली. तेव्हा मनसेच्या जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनी त्यांना मनसेकडून निवडणूक लढवावी अशी गळ घातली पण लोखंडे यांनी नकार दिला. दरम्यानच्या काळात सेनेचे सबाजी गायकवाड यांनी लोखंडे यांना लोकसभा लढवावी असा सल्ला दिला. त्यामुळे त्यांनी आमदार काळे यांची भेट घेतली. काळे हे लोखंडे यांना घेऊन ‘मातोश्री’वर गेले. कार्याध्यक्ष ठाकरे यांना लोखंडे यांना उमेदवारी द्या, मी त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतो असे सांगितले. काळे यांच्या आग्रहामुळे लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली. सेनेचे काही पदाधिकारी मात्र काही काँग्रेस नेत्यांच्या कानमंत्रानुसार लोखंडे यांच्या उमेदवारीला खो घालत होते. त्याला काळे यांनी जुमानले नाही. अखेर लोखंडे यांची उमेदवारी निश्चित झाली. निवडणुकीत अवघ्या १५ दिवसांच्या घडामोडीत लोखंडे हे खासदार झाले.
राजकारणात योग्यवेळी योग्य निर्णय घेतले, चांगले सल्लागार मिळाले तर संधीचे कसे सोने होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे लोखंडे हे होय. लोखंडे यांना शिर्डी मतदारसंघाची माहितीही नव्हती, पण आमदार काळे यांनी यंत्रणा उभी केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर छुप्या तडजोडी केल्या. लोखंडे यांच्या यशाचे ते शिल्पकार बनले. लोखंडे यांना जशी खंबीर साथ काळे यांनी दिली. तशी साथ वाकचौरे यांना काँग्रेसजनांनी दिली नाही. त्यामुळे सल्लागार आणि साथीदार हे राजकारणात महत्त्वाचे असतात हेदेखील स्पष्ट झाले आहे.