सातारा जिल्ह्यत करोनाबाधित निष्पन्नता व मृतांची संख्या झपाटय़ाने वाढत असून, शुक्रवारी १०० रुग्ण निष्पन्न झाले. तर, तिघांचा मृत्यू होताना ही संख्या ५१ झाली होती. काल रात्री  दोन टप्प्यांमध्ये प्राप्त अहवालानुसार अनुक्रमे १० व ४८ असे ५८ रुग्ण निष्पन्न झाले. तर, चौघांचा मृत्यू होताना ही संख्या आता ५५ झाली. रविवारी करोना संसर्गासंदर्भातील ताजी माहिती सायंकाळपर्यंत उपलब्ध झाली नाही.

करोना संशयित म्हणून आजवर १४,७१६ व्यक्तींच्या घशातील स्त्रावांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले. त्यातील करोनाबाधित म्हणून १,३०४ निष्पन्न झाले. करोनाबाधित निष्पन्नतेचे हे प्रमाण संशयितांच्या तुलनेत ८.८६ टक्के आहे. उपचाराधीन ७८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. उपचारांती बरे होणाऱ्यांचे हे प्रमाण रुग्ण निष्पन्नतेच्या ६०.१२ टक्के आहे. तर, सध्या ४६५ व्यक्ती उपचाराधीन आहेत. करोनाबाधित निष्पन्नतेच्या तुलनेत उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण ३५.६५ टक्के आहे. करोनाबळींची संख्या ५५ असून, ती रुग्ण निष्पन्नतेच्या तुलनेत ४.२१ टक्के आहे. आज करोनासंशयित ३३९ व्यक्तींच्या घशाच्या स्त्रावांचे नमुने प्रयोगशाळांकडे तपासणीसाठी पाठवले गेले.

जिल्ह्यतील सर्व अकराही तालुक्यात रुग्ण निष्पन्न झाले असून, मुंबई, पुण्यात नोकरीस असणारे लोक मोठय़ाप्रमाणात आपल्या मूळगावी आल्याने करोनाचा संसर्ग फैलावला आहे. साहजिकच जिल्ह्यबाहेर मोठय़ाप्रमाणात लोक नोकरीस असणाऱ्या तालुक्यांनाच करोना संसर्गाची सर्वाधिक झळ पोहोचली आहे. दरम्यान, टाळेबंदी सैलावतानाच माणचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी हा निर्णय अंगलट येण्याची भीती व्यक्त केली होती. तर, कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी करोना संकट निवारण करताना, यंत्रणेकडून होणाऱ्या चुका जाहीरपणे मांडल्या होत्या. त्यामुळे टाळेबंदी हटली ते योग्य की अयोग्य आणि करोना संकटकाळात यंत्रणेचा वेळकाढूपणा झाला की काय? याबाबतही चर्चा होत राहिली. असे असतानाच परवा सातारचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लोक जर स्वयंशिस्त पाळत नसतील,तर टाळेबंदी पुन्हा लागू करणे योग्य ठरेल असे परखड मत मांडले. लोकप्रतिनिधींच्या या प्रतिक्रिया नक्कीच वस्तुस्थिती दर्शवणाऱ्या किंवा काय याबाबत शासन व प्रशासनाने खुलासा करणे आजमितीला महत्त्वाचे ठरणार आहे. तर, लोकांनी स्वयंशिस्त न पाळल्यास राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अधिकारानुसार पुन्हा टाळेबंदी लागू होण्याची दाट शक्यता प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.