महापालिकेच्या स्थायी समितीसमोरील बहुसंख्य विषय पदाधिकारी व प्रशासनातील समन्वयाअभावी स्थगित ठेवण्यात आले किंवा रद्द करण्यात आले. अवघे चार विषय मंजूर करण्यात आले. एका विषयास अर्धवट मंजुरीचा प्रकारही घडला.
सभापती किशोर डागवाले यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सभेपुढे १६ विषय सादर करण्यात आले होते. वाहतुकीसाठी बसस्थानक चौकातील शेतक-यांच्या पुतळ्याचा चौथारा काढणे, भूषणनगर येथील महिला व्यायामशाळा खासगी संस्थेऐवजी मनपानेच चालवणे, राजीव आवास योजनेसाठी झोपडपट्टय़ांचे सामाजिक-आर्थिक पाहणी करणे व बांधकामावर देखरेख करण्यासाठी संस्था नियुक्त करण्यासाठी इ-निविदा मागवणे हे विषय मंजूर करण्यात आले. स्पर्धा परीक्षा केंद्राच्या संचालकपदी डॉ. एन. बी. मिसाळ यांना मुदतवाढ देण्यात आली. वार्षिक दैनंदिन साहित्य खरेदीसाठी इ-निविदा मागवण्याच्या विषयावर महासभा निर्णय घेणारच आहे, त्याला अधीन राहून मंजुरी देण्यात आली. ही मंजुरी अर्धवट निर्णयासारखी ठरली.
इतर सर्व १४ विषय पदाधिकारी व प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याने एक तर स्थगित ठेवण्यात आले किंवा रद्द करण्यात आले. त्यात बुरुडगाव येथील कचरा डेपोत जमा झालेल्या कच-याची विल्हेवाट लावण्याकरिता संस्था नियुक्तीचा विषयही आहे. हा विषय न्यायप्रविष्ट झालेला आहे. न्यायालयाने याबाबत निर्देशही दिलेले आहेत. मात्र संस्था नेमणुकीचा मुद्दा वाटाघाटीवरच अडलेला आहे.