२१ ते ४० वयोगटातील ८८१ जणांना लागण

निखिल मेस्त्री/नीरज राऊत

पालघर : जगभरात व देशात करोनाचा संसर्ग ज्येष्ठ नागरिकांना व इतर आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून येत असताना पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र तरुण करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. एकूण एक हजार ८४७ करोनाबाधितांमध्ये ८८१ तरुणांचा समावेश आहे.   २१ ते ४० या वयोगटातील हे तरुण आहेत.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १५ जुलैपर्यंत एकूण एक हजार ८४७  नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे.  त्यापैकी ८८१  रुग्ण हे २१ ते ४० वयोगटातील असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यापैकी अधिकतर बाधित रुग्ण हे आरोग्य विभागात कार्यरत आहेत. ४१ ते ६० या वयोगटात ४९७ रुग्ण आढळले असून यापैकी अधिकतर बाधित हे पोलीस विभागात तसेच मुंबई शहरात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असल्याची माहिती आहे. बाधित पालकांकडून लहान मुलांना या आजाराचा प्रसार झाला असून त्यांची संख्यादेखील सुमारे ३४२ इतकी आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १३५ ज्येष्ठ नागरिकांना करोना संसर्ग झाला आहे. त्यापैकी अधिक तर मंडळींना इतर आजारांची व्याधी असल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत २५ नागरिकांचा  मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तरुण व मध्यमवर्गीयांची संख्या लक्षणीय आहे. त्यामध्ये मुंबई व उपनगरात काम करणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे बाधित झालेल्या व्यक्तींचा समावेश आहे.  दाटीवाटीच्या वस्तीमध्ये करोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्याचा प्रसार झपाटय़ाने झाला आहे. शासनाच्या निर्बंधाचे पालन न करणे, सामाजिक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे,  उपचारासाठी मुंबई व उपनगरात प्रवास करणे तसेच अत्यावश्यक सेवेत कर्मचाऱ्यांकडून संसर्ग होण्याची प्रमुख कारणे देण्यात येत असून जिल्ह्यात सध्या ‘चेस द वायरस’ ही मोहीम राबविण्यात येत आहे.

 

वयोगट  ए      कूण बाधित     टक्के          मृत्यू    

१० वर्षांखाली    १३८              ७.४७                ०

१० ते २०         २१४           ११.५९                   ०

२१ ते ३०          ४४१           २३.८८                  १

३१ ते ४०         ४४०           २३.८२                   ६

४१ ते ५०         २८२           १५.२७                   ४

५१ ते ६०      २१५              ११.६४                   ९

६१ ते ७०      ८२               ४.४४                      ५

७१ ते ८०      २९              १.५७                       ०

८० वर्षांपुढे      ६             ०.३२                      ०

१८४७                                        २५