काँग्रेसचे वर्षांनुवर्षे अबाधित असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीने काँग्रेसचे अस्तित्व औषधापुरतेही शिल्लक राहिले नाही. कोल्हापूरच्या गडावर शिवसेनेचा भगवा फडकत राहिला असून तब्बल सहा जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. पाठोपाठ भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळवला आहे. भाजपाने आणखी एका जागेची कमाई केली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष के.पी. पाटील यांच्यारुपाने एक जागा गमावली आहे.
विधानसभा निवडणुकीचे निकाल पहिल्याफेरीपासून हाती येऊ लागले, तसतसे जिल्ह्यात शिवसेना वरचढ होत असल्याचे दिसून येऊ लागले. सहा जागांवर शिवसेनेचे वर्चस्व होते, ते अखेपर्यंत कायम राहिले. आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके व आमदार डॉ. सुजित मिणचेकर या शिवसेनेच्या तिघा उमेदवारांनी विजय मिळवताना अनुक्रमे सत्यजित कदम, जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी.एन. पाटील व माजी मंत्री जयवंतराव आवळे या काँग्रेसच्या उमेदवारांचा दारूण पराभव केला. याशिवाय राधानगरीतून प्रकाश आबिटकर यांनी नेत्रदीप विजय मिळवताना के.पी. पाटील यांच्यावर जोरदार मात केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतलेल्या उल्हास पाटील यांनी स्वाभिमानीच्या बालेकिल्ल्यात विजयाची नोंद केली. तब्बल १५ हजाराहून अधिक मताधिक्य घेत विजयी झालेल्या उल्हास पाटील यांच्यानंतर या मतदारसंघात राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर, डॉ. सा.रे. पाटील व स्वाभिमानीचे सावकार मादनाईक यांना मते मिळाली. शाहुवाडी मतदारसंघात मात्र अखेपर्यंत अतिशय चुरशीची लढत झाली. शिवसेनेचे सत्यजित पाटील यांनी प्रारंभापासून चांगलीच आघाडी घेतली होती. पण पन्हाळा तालुक्यातील मतमोजणी सुरू झाल्यावर आमदार विनय कोरे यांच्या पारडय़ातील मतांमध्ये वाढ होऊ लागली. अखेर अवघ्या साडेतीनशे मताधिक्यांनी पाटील यांनी विजय प्राप्त केला.
जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी लढत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात झाली. माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांच्याविरूद्ध काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडीक यांचे पुत्र अमल महाडिक यांनी लढा देण्याचे ठरविले. तेंव्हाच माहाडीक-पाटील यांच्यातील राजकीय वैमनस्याचे नवे पर्व सुरू झाले. उभय बाजूची प्रतिष्ठा असलेल्या या मतदारसंघात अमल महाडीक यांनी १० हजाराहून अधिक मताधिक्य घेत पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का दिला. काँग्रेसचे जयवंतराव आवळे व प्रकाश आवाडे हे दोन माजी मंत्रीही पराभवाला सामोरे गेले. हातकणंगलेत शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर यांनी आवळे यांचा, तर इचलकरंजीमध्ये भाजपाचे सुरेश हाळवणकर यांनी आवाडे यांचा दारूण पराभव केला. हे दोघेही दुस-यांदा विजयी झाले आहेत.
जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ व शिवसेनेचे संजय घाटगे यांच्यातही मतांमध्ये सतत चढउतार होत राहिली. प्रारंभी घाटगे यांनी मताधिक्य घेतले होते. पण मुश्रीफ यांनी प्रतिष्ठेच्या लढतीत जिल्हा काबीज केला. चंदगड या मतदारसंघात आमदार संध्यादेवी कुपेकर या घराण्यातील भाऊबंदकीमुळे निवडणूक लढवण्यास तयार नव्हत्या पण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्या रिंगणात उतरल्या. चंदगडच्या मतदारांनी सलग दुस-यांदा कुपेकर यांना विजयी केले.