बाजारपेठा सजल्या, तीळगुळाचे भाव वधारले

विरार :  करोनाकाळात सर्वच सणांना विरजण लागल्याने नववर्षांच्या सुरुवातील येणाऱ्या संक्रांती सणासाठी नागरिकांमध्ये उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. त्यासाठी बाजारपेठा सजल्या असून बाजारात नागरिकांचीसुद्धा गर्दी पाहायला मिळाली. पण या वर्षी तीळ आणि गुळाच्या किमती वाढल्याने सामान्यांची संक्रांत महागाईने कडवट केली आहे.

करोना प्रादुर्भाव कमी होत असताना नागरिकांमधील भीतीचे वातारणसुद्धा कमी होत आहे. यामुळे पुन्हा सणावारासाठी बाजारपेठ सजत आहेत. संक्रांतीमध्ये पतंग उडविण्याची प्रथा आहे. यामुळे बाजारात वेगवेगळ्या रंगांच्या, आकारांच्या, बनावटीच्या पतंग आल्या आहेत. तसेच प्लास्टिक बंदी असल्याने बाजारात कागदाच्या पतंगाची अधिक चलती आहे. त्याची किंमत ५

रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. पण त्यांच्या किमतीतही २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे पतंग विक्रेत्यांनी सांगितले. करोनामुळे पतंग महोत्सवाला बंदी असल्याने पतंगाचे खप घटले आहेत. तसेच मांजाचे दरसुद्धा वधारले आहेत.

त्याचबरोबर तीळ, गूळ आणि शेंगदाणे यांच्या भावातसुद्धा यावर्षी वाढ झाली आहे. तीळ १६० ते २०० रुपये किलो आहेत. तर गूळ ७० ते १०० रुपये किलो असून शेंगदाणेसुद्धा १२० ते १५० रुपये किलो झाले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा १० ते २० टक्के दर वाढले आहेत. तसेच तयार तीळगुळाचे लाडू ३०० ते ४०० रुपये किलो विक्री होत आहे. पण या वर्षी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने हळदी कुंकाचे कार्यक्रम होत नसल्याने त्यांचीसुद्धा विक्री कमी झाली आहे.

एकूणच नागरिकांमध्ये सणाचे वातावरण मोठय़ा उत्सवाचे आहे. अनेक सोसायटीच्या गच्चीवरून रंगीबेरंगी पतंग आकाशात उडताना दिसत आहेत. यामुळे आकाश रंगीत झाले आहे.