पंढपुरात दारुबंदी व्हावी यासाठी पाठपुरावा करणार
देहु,आळंदी आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्रामध्ये तत्काळ कायमस्वरूपी दारूबंदी करावी. याबाबत वारकरी, फडकरी आणि संत मंडळींना बरोबर घेऊन लवकरच मुख्यमंत्री यांना भेटणार आहे, अशी माहिती भाजपचे राज्यसभेचे सदस्य अमर साबळे यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्य़ातील आबंवडे हे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव हे आदर्श सांसद ग्रामच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहे. या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारणार असल्याचे साबळे यांनी सांगितले.
अमर साबळे हे पंढरपूरला आले असता येथील विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या अनेक वषार्ंपासून देहू, आळंदी आणि पंढरपूर येथे दारू बंदी व्हावी अशी मागणी होती. मात्र या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले. नुकतीच आषाढी यात्रेबाबत पुण्यात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बठक झाली. या बठकीत हा मुद्दा मांडला होता. याबाबत येथील वारकरी सांप्रदायातील मंडळींना भेटून दारूबंदी बाबत माहिती देण्यास आली आहे, असे साबळे यांनी स्पष्ट केले. या ठिकाणी दारूबंदी कायमस्वरूपी व्हावी याकरिता शासन दरबारी पाठपुरावा करू, असेही त्यांनी या वेळी सांगितले. मुंबई-गोवा महामार्गालगत असणारे रत्नागिरी जिल्ह्य़ातील आंबडवे गाव हे बाबासाहेबांचे गाव आदर्श सांसद ग्राम म्हणून आपण दत्तक घेतले असून याला मंजुरी मिळाली आहे. या ठिकाणी भारतरत्न डॉ आंबेडकर यांचे अत्याधुनिक स्मारक उभे करणार आहे. तसेच विविध विकासकामे करण्यासाठी ३९० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला सल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर शहीद भगतसिंग यांचे जन्मगावदेखील दत्तक घेतले असून या गावचा विकासही करणार असल्याचे साबळे यांनी सांगितले.