संरक्षण, रेल्वे व अवजड उद्योगांत सरकारला लागणारी उत्पादने औरंगाबाद शहरात तयार व्हावीत. अशी उत्पादने तयार करण्यात औरंगाबाद हे केंद्र म्हणून विकसित व्हावे, या साठी उद्योजकांच्या संघटनांनी २ ते ५ जुलदरम्यान विशेष प्रदर्शनांचे आयोजन केले आहे. मराठवाडय़ातील काही उद्योजक आजही संरक्षण व रेल्वे विभागास उत्पादने पुरवितात. येथील उत्पादनांची ८० देशांत निर्यात होते. या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पासाठी औरंगाबाद हे डेस्टिनेशन व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती मराठवाडा ऑटो क्लस्टरचे प्रमुख राम भोगले यांनी दिली.
औद्योगिकरणाला चालना मिळावी म्हणून संरक्षण, रेल्वे व अवजड उद्योगातील खरेदी प्रक्रियेत अनेक महत्त्वपूर्ण बदल केले जात आहेत. पंचवीस हजार कोटी रुपयांची खरेदी देशातील कंपन्यांकडून व्हावी, असे सरकारला अपेक्षित आहे. ती उत्पादने औरंगाबादमध्ये तयार होऊ शकतात, असा औरंगाबाद येथील उद्योजकांचा दावा आहे. सध्या औरंगाबादेतून रडारमध्ये लागणारी मोटार संरक्षण दलास पुरविली जाते. तसेच अवजड उद्योग मंत्रालयामार्फत सुरूअसणाऱ्या भेल प्रकल्पासही २०० टनांहून अधिक फॅब्रिकेशन पुरविले जाते. मात्र, तुलनेने ही उत्पादने एकूण मागणीच्या नगण्य म्हणता येईल, एवढीच आहेत. यात वाढ करणे शक्य आहे. तशी क्षमता मराठवाडय़ातील उद्योजकांकडे आहे. उपलब्ध साधनसामग्री आणि क्षमता लक्षात याव्यात, म्हणून औरंगाबाद येथे पाच दिवस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामन, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. दुसऱ्या दिवशी संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांची उपस्थिती असणार आहे. संरक्षण विभागात कोणत्या प्रकारची खरेदी मेन इन इंडियामध्ये अपेक्षित आहे, याची माहिती उद्योजकांना या वेळी मिळणार आहे. त्यांच्यासमवेत खरेदी विभागातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, अवजड उद्योगमंत्री अनंत गीते हेही कार्यक्रमास येणार असून प्रदर्शनाचा समारोप उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत ४ जुल रोजी होईल. प्रदर्शन सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
सध्या औरंगाबाद शहरातून मोठय़ा प्रमाणात निर्यात होते. मेक इन इंडियाच्या धोरणानुसार केंद्र सरकारने काही उत्पादने मराठवाडय़ातील उद्योजकांकडून खरेदी केली, तरी रोजगार संधी अधिक वाढतील, असा दावा उद्योजक करीत आहेत. उद्योजकांच्या सोयीसाठी सेंटर फॉर एक्सलन्सची इमारत उभारली असून तेथेच हा कार्यक्रम होणार असल्याचे चेंबर्स ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष मुनीष शर्मा यांनी सांगितले.