शेती करताना शेतकरी बांधव स्थानिक गरजा ओळखून त्यानुसार आपल्या शेतीच्या साधनांमध्ये व यंत्रसामुग्रीमध्ये बदल करत असतात. हे तांत्रिक ज्ञान ते आपल्या दैनंदिन अनुभवातून विकसित करत असतात. यामुळे त्यांना यंत्रसामुग्री वापरणे अधिक सोईचे, सुविधाजनक होत असते. असेच अभियांत्रिकीत शिक्षण झालेले नाशिक जिल्ह्यातील शेतकरी राजेंद्र जाधव यांनी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक स्थानांची स्वच्छता करण्यासाठी स्व-अध्ययनातून एक यंत्र विकसित करता येईल का, याविषयी संशोधन सुरू केले. यासाठी त्यांनी शेतीच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामुग्रीचा प्राधान्याने विचारपूर्वक वापर केला. अवघ्या २५ दिवसांमध्ये राजेंद्र जाधव यांनी ट्रॅक्टरवर बसवता येवू शकेल, असा नाविन्यपूर्ण फवारा यंत्रणा विकसित केली. या फवाऱ्याच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर रस्ते, सोसायट्या, दारे, कुंपणाच्या भिंती अगदी स्वच्छ धुवून काढणे शक्य होत आहे.

या फवाऱ्यामध्ये एकमेकांच्या विरुद्ध दिशेला ॲल्युमिनीयमची दोन पाती बसवण्यात आली आहेत. दोन्ही पाती विरुद्ध दिशेने हवा शोषून घेतात व नोझल (छिद्र) मधून उच्च दाबाने निर्जंतुकीकरणाच्या द्रावाच्या तुषारांचे सिंचन सर्व दिशांना करतात. ही पाती 180 अंशाच्या कोनामध्ये फिरतात. तसेच जमिनीपासून 15 फूट उंचीपर्यंतच्या भिंतीचीही स्वच्छता करण्यास ती सक्षम आहेत. या फवाऱ्याव्दारे स्वच्छता, निर्जंतुकीकरणासाठी 15 अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरचा वापर केला जाऊ शकतो.

या स्वच्छता यंत्रामध्ये एकावेळेस 600 लीटर जंतुनाशक मिश्रीत द्रावण टँकरमध्ये ठेवण्याची सुविधा आहे. त्यामुळे या फवाऱ्याने कुंपणाच्या भिंती, दारे यांची स्वच्छता करणे सोईचे आहे. या फवाऱ्याच्या मदतीने निर्जंतुकीकरणाच्या कामाचा आणखी एक फायदा म्हणजे, या कामामध्ये मानवी हस्तक्षेपाची फार कमी आवश्यकता भासते. त्यामुळे विषाणूंचा मानवाशी संपर्क येण्याची शक्यता खूप कमी आहे. फक्त एकच व्यक्ती म्हणजे, जी ट्रॅक्टर चालक आहे, ती व्यक्ती हे यंत्र संचलित करून संपूर्ण गावाची स्वच्छता करू शकते, अशी माहिती यंत्राचे विकासक राजेंद्र जाधव यांनी दिली. ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात राजेंद्र जाधव यांच्या कार्याचे कौतुक केलं आहे.

या यंत्राच्या विकासासाठी सुमारे 1.75 लाख रूपये खर्च आला आहे, असेही जाधव यांनी सांगितले. या फवाऱ्याचा वापर सटाणा नगरपालिकेच्यावतीने सटाणा गावात जवळपास 30 किलोमीटर क्षेत्रामध्ये स्वच्छता करण्यासाठी केला जात आहे. कोविड-19 वर विजय मिळवून देणारे हे अभिनव फवारणी यंत्र असल्याने राजेंद्र जाधव यांनी आपल्या या यंत्राला ‘यशवंत’ असे नाव दिले आहे. त्यांना आपल्या या अनोख्या फवाऱ्याच्या पेटंटसाठी म्हणजेच बौद्धिक स्वामित्वासाठी अर्ज दाखल केला आहे. तसेच (एनआयएफ) ‘नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’कडेही त्याचे डिझाईन पाठवले आहे. कोरोना प्रसाराविरुद्धच्या लढाईमध्ये भारतातल्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षमतेचे दर्शन देणारे हे अभिनव यंत्र आहे.