राज्य सरकारने हिंसक संघटनांची यादी करावी. त्यामुळे अशा संघटनांची माहिती जनतेला होईल आणि पोलिसांना तपास करणे सोपे जाईल, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. आंबेडकर यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत राज्यात घडत असलेल्या हिंसक घटनांबद्दल चिंता व्यक्त केली.
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यानंतर आधीच्या आघाडी सरकारकडे अशीच मागणी केली होती. कॉ. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्लाही तशाच प्रवृत्तींनी केलेला आहे. विचाराला विचाराने विरोध करणाऱ्या पुरोगामी विचारवंतांना संपण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी अशा संघटनांचा शोध घेऊन त्यांची यादी तयार केली पाहिजे. त्यामुळे अशा संघटनांची माहिती जनतेला होईल, तसेच पोलिसांना नेमक्या कोणत्या संघटनेविषयी कठोर आणि कोणत्या संघटनेशी सौम्य वागावे, याचे स्पष्ट भान राहील. त्यामुळे अशा हल्लाखोरांना हुडकून काढणेही शक्य होईल, असेही ते म्हणाले. हिंसक संघटना आणि हिंसक कारवाया करणाऱ्या संघटना, अशी यादी सरकारकडे असल्यास पोलिसांना तपासात मदत होईल. शिवाय, समाज अशा संघटनांना थारा देणार नाही, असेही ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2015 3:45 am