राज्यात दुष्काळाचा वणवा पेटलेला असतानाच पक्षीय मजबुतीचे टेंभे घेऊन सत्ताधारी आघाडीतील दोन्ही प्रमुख पक्ष सरसावल्याचे चित्र समोर आले आहे. निमित्त दुष्काळाचे असले, तरी दुष्काळाच्या पडद्याआडून पक्षीय मजबुतीचा डाव साध्य करण्याचा छुपा अजेंडाच दोन्ही काँग्रेसने राबविण्याचे ठरविले आहे. या घडामोडी पाहता दुष्काळासारख्या प्रश्नावरही आघाडीत समन्वय नसल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्याच्या बहुतेक भागात यंदा कमी पावसामुळे दुष्काळाची पडछाया तयार झाली आहे. प्रामुख्याने मराठवाडय़ात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. निम्म्याअधिक मराठवाडय़ाची तहान भागविणाऱ्या जायकवाडी जलाशयाची पातळी मृत साठय़ापेक्षाही खाली गेली होती. त्यामुळे वरच्या भागातील धरणांमधून दोन टप्प्यांत (आधी अडीच टीएमसी व नंतर नऊ टीएमसी) ११ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्यात आले. परंतु आता यापुढे आणखी पाणी खाली दिले जाणार नसल्याचे राज्य सरकारतर्फे न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढतच असताना दुष्काळ निवारणाचे सरकारचे प्रयत्न मात्र तोकडेच ठरत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे दुष्काळाच्या प्रश्नावरून आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याची बाब गेल्या काही दिवसांत घडणाऱ्या घडामोडींवरून समोर आली आहे. आधी राष्ट्रवादी काँग्रेसने व आता काँग्रेसने पक्षीय पातळीवर दुष्काळाचा नेम साधून एकमेकांवर शरसंधान करण्याची खेळी सुरू केली आहे. पक्ष मजबुतीचे गोंडस नाव देऊन दुष्काळाची गावनिहाय माहिती गोळा करण्याचा काँग्रेसने प्रयत्न सुरू केला आहे. प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या पातळीवर दुष्काळ निवारण समिती स्थापन करून दुष्काळाचा आढावा घेण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.