पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्तेत सहभागी उद्धव ठाकरे यांनी चार वर्षात दिलेली आश्वासने कधीच पूर्ण केली नाहीत. अशा लोकांना घालवून नव्याने परिवर्तन घडवल्याशिवाय गप्प राहायचं नाही, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिन्नर येथे केले.

यावेळी राफेलचा मुद्दा घेवून जयंत पाटील यांनी मोदींवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, भारताने फ्रान्सकडून सुरुवातीला अत्याधुनिक असे एफ ४ के विमान ५७० कोटी रुपयांना खरेदी केले. त्यानंतर मोदी सरकारने तेच विमान साडे सोळाशे कोटींना का खरेदी केले, यामध्ये विशेष असं काय होतं? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

राज्यातील २२ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. यांपैकी १६ मंत्र्यांची साधी चौकशीही करण्यात आली नाही. राज्य शासनाने स्वतःच्या राज्यातील जनित्रे खरेदी करण्याऐवजी बाहेरच्या देशातून महागडी वीज खरेदी केली आहे. सरकारने बनवलेली पॉवर स्टेशन बंद करण्याचा घाट सुरू आहे. शेतकऱ्यांची वीज सरकारने चारवेळा महाग केली. गुंतवणूक झाली नाही. त्यामुळे बेकारी वाढण्यासाठी ही कारणे महत्वाची आहेत, असेही पाटील म्हणाले.

पाटील म्हणाले, डोंबिवलीमध्ये भाजपा उपाध्यक्षाच्या दुकानात दंगा करण्यासाठी १७० हत्यारे सापडली. हा भाजपाचा चेहरा आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साम-दाम-दंड-भेदाचे आदेश दिल्यामुळे हा प्रकार समोर आला आहे. आता हा अडवाणींचा पक्ष राहिला नाही तो सभ्य अमित शहांचा पक्ष आहे, असा टोला पाटील यांनी लगावला.