Malegaon Blasts 2008 Case:  २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटाला १० वर्षे उलटल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह आणखी पाच आरोपींविरोधातील खटल्याला २ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. या आरोपींवर गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असलेली आरोप निश्चितीची प्रक्रिया राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने मंगळवारी पूर्ण केली.  मात्र आपण निर्दोष असल्याचा दावा या आरोपींनी केला आहे.

शुक्रवारपासून सुनावणी

२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटाला १० वर्षे उलटल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह आणखी पाच आरोपींविरोधातील खटल्याला २ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या आरोपींवर गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असलेली आरोपनिश्चितीची प्रक्रिया राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने मंगळवारी पूर्ण केली.

बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि भादंविअंतर्गत बॉम्बस्फोटासारख्या दहशतवादी कारवाईचा कट रचणे, तो अमलात आणणे, त्याद्वारे निष्पापांचा खून करणे, त्यांना गंभीररीत्या जखमी करणे इत्यादी गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. मात्र, हे आरोप अमान्य असल्याचे नमूद करत आपण निर्दोष असल्याचा दावा या आरोपींनी केला.

या प्रकरणी साध्वी, पुरोहितसह अन्य पाच आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आल्यावर त्यांनी ते अमान्य केले. त्यामुळे त्यांच्यावर खटला चालवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करीत विशेष न्यायालयाने प्रकरणाची पहिली सुनावणी २ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. या प्रकरणी साध्वी, पुरोहित आणि अन्य आरोपी दोषी ठरले, तर त्यांना जन्मठेप वा फाशीची शिक्षा होऊ शकते. आरोपींवर स्फोटके कायद्यानुसारही आरोप निश्चित करण्यात आले आहेत. साध्वी आणि पुरोहितशिवाय निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी या पाच आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

दहशतवादी कारवायासाठी आरोपी हे ‘अभिनव भारत’ या संघटनेच्या माध्यमातून एकत्र आले आणि त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाचा कट रचला. तो अमलात आणण्यासाठी त्यांनी स्फोटकेही तयार केली, असेही न्यायालयाने आरोप निश्चित करताना नमूद केले.

यापूर्वी २६ ऑक्टोबर रोजी आरोप निश्चित करण्यात येणार होता. मात्र प्रकरणाची जलदगतीने सुनावणी घ्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले असतानाही पुरोहित आणि कुलकर्णी वगळता  अन्य आरोपींनी असहकाराची भूमिका घेत सुनावणीला हजर राहणे टाळले. त्यामुळे त्यांच्यावर आरोप निश्चित करता आले नव्हते.

दरम्यान, २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथील मुस्लिम बहुल परिसरात बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. त्यात सहाजणांचा मृत्यू झाला होता.