अनिकेत साठे

गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहरात थैमान घातलेल्या करोना विषाणूची महापालिका आयुक्तांनाही लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. महापालिका आयुक्त यांच्यासह एका सहाय्यक आयुक्तालाही बाधा झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे व कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात सुरु असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीतच करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळताच महापालिका आयुक्त तातडीने बैठकीतून बाहेर पडले.

शहरात करोनाचा कहर सुरू असतानाच तत्कालीन आयुक्त किशोर बोर्डे हे रजेवर गेल्याने नगर विकास विभागाने अमरावती येथून अधिकाऱ्याची मालेगावच्या महापालिका आयुक्तपदी बदली केली होती. २८ एप्रिल रोजी त्यांनी आपला पदभार स्वीकारला होता. त्यानंतर करोना संदर्भात त्यांनी धडाक्यात कामकाज सुरू केले होते.

बुधवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे हे अचानक मालेगावात आले. कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ते करोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेत असताना सायंकाळी याच ठिकाणी हा अहवाल प्राप्त झाला. आयुक्तांसह तीन महिन्यांपूर्वीच येथे रुजू झालेल्या २९ वर्षीय एका सहाय्यक आयुक्तांनाही बाधा झाल्याचे यावेळी निष्पन्न झाले आहे. यामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली.