आठवडाभरात नव्याने करोना रुग्ण आढळून आलेली शहरातील ३७ ठिकाणे महापालिका प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित केली आहेत. त्यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या आता ११९ झाली आहे. शनिवारी आणखी तीन रुग्णांचा सकारात्मक अहवाल प्राप्त झाल्याने शहर आणि तालुक्यातील करोना बाधितांची संख्या ६२१ झाली आहे. तर जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ७७६ वर पोहचली आहे.

यापूर्वी करोना रुग्ण आढळून आलेली शहरातील ८२ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित करून हा भाग बंदिस्त करण्यात आला आहे.  आठवडय़ात नव्याने १५९ करोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यातील काही रुग्ण प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नव्या भागातील आहेत. अशा प्रकारे नव्याने रुग्ण आढळून आलेली आणखी ३७ ठिकाणे पालिका उपायुक्त नितीन कापडणीस यांनी प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित केली आहेत. त्यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची एकूण संख्या आता ११९ झाली आहे.

नव्याने प्रतिबंधित म्हणून घोषित केलेल्या क्षेत्रांमध्ये पालिका आयुक्तांचे निवासस्थान, हॉटेल सुखसागर, साई लॉन्स, चिंतामणी लॉन्स, प्रथम लॉन्स, शिंपी मंगल कार्यालय, ऐश्वर्या लॉन्स, अग्रसेन भवन आणि शहर पोलीस ठाणे परिसर आदी भागांचा समावेश आहे.

शुक्रवारी सायंकाळी शहरातील हिंगलाजनगर आणि वृंदावन चौक भागात प्रत्येकी एक तसेच जुने नाशिक आणि नाशिक रोड येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. शनिवारी मालेगावातील एकूण १२२ चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यात तीन सकारात्मक आणि ११९ अहवाल नकारात्मक आले. सकारात्मक अहवाल आलेल्यांमध्ये २४ वर्षांचा तरुण आणि ४० तसेच ५५ वर्षांच्या महिलांचा समावेश आहे. नव्याने तीन रुग्णांची भर पडल्याने करोना रुग्णांची तालुक्याची संख्या ६१९ आणि जिल्ह्यातील संख्या ७७६ झाली आहे.

नाशिकमध्येही प्रतिबंधित क्षेत्रात वाढ

नाशिक शहरात नव्याने आढळलेला करोना रुग्णाचा निवासस्थान परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्या नुसार कुंभारवाडा, नाशिकरोड येथील गोसावी वाडी आणि दसक येथील सिध्देश्वरनगर हे तीन क्षेत्र महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले. शहरातील करोनाबाधितांची संख्या ४५ वर पोहचली आहे. यातील उपचार घेऊन ३२ जणांना घरी पाठविण्यात आले. दोन जणांचा मृत्यू झाला. महापालिका हद्दीतील सकारात्मक रुग्णांची संख्या ४१ आहे. तसेच महापालिका हद्दीतील चार आरोग्य कर्मचारी सकारात्मक आढळले. करोनाग्रस्त भागातून १४२१ नागरिक शहरात आले. त्यातील ८१५ हून अधिक नागरिकांचे १४ दिवसीय सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे.