सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळून शुक्रवारी मालेगाव तालुक्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिन्ही शेतकरी तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील रहिवासी होते.

पहिली घटना तालुक्यातील कंधाणे गावात घडली. ज्ञानेश्वर शिवणकर (३५) यांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. विषारी पदार्थाचे सेवन केल्यानंतर शिवणकर हे विक्रीसाठी शेतात ठेवलेल्या कांद्यावर झोपले होते. दोन-तीन वर्षांपासून शेतीतून उत्पन्न नाही. यावर्षी अपुऱ्या पावसात कांदा कसाबसा जगवला, परंतु भाव नसल्याने ज्ञानेश्वर शिवणकर हे काळजीत होते. भाव वाढतील या आशेवर महिन्याभरापासून त्यांचा कांदा शेतात पडून होता. भाव न वाढल्याने तसाच पडून असलेल्या या कांद्याला कोंब फुटू लागल्याचे लक्षात येताच ते हताश झाले. या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, आई आणि वडील असा परिवार आहे. त्यांच्यावर स्थानिक विकास संस्था आणि खासगी असे मिळून तीन लाखाचे कर्ज असल्याचे समजते.

दुसरी घटना नांदगाव बुद्रुक येथे घडली. चेतन बच्छाव (२३) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघड झाले. चेतन अविवाहित असून सकाळी शेतातील घराचा दरवाजा न उघडल्याने नातेवाईकांनी दरवाजा तोडला असता हा प्रकार उघड झाला. त्याच्यावर स्थानिक विकास संस्थेचे ६५ हजार आणि एका खासगी वित्तीय संस्थेचे सव्वापाच लाखाचे कर्ज आहे.

तिसरी घटना सायने गावात घडली. वसंत सोनवणे (४५) यांना गुरूवारी विषप्राशन केल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतांना शुक्रवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर विकास संस्थेचे दीड लाख आणि घरकुल योजनेंतर्गत घेतलेले एक लाखाचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आहेत.