मल्हारराव होळकर यांच्याविषयी कथित अवमानकारक लिखाण

मल्हारराव होळकर यांच्याविषयी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांतून कथित हीन दर्जाचे लिखाण केल्याच्या निषेधार्थ सोलापुरात मल्हार युवा प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या प्रतिमेला  ‘जोडेमार’ आंदोलन करण्यात आले.

फेसबुकवर ठाणे येथील माहितीची पोस्ट टाकताना आमदार आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याविषयी मानहानीकारक लिखाण केल्याचा आरोप सोलापूरच्या मल्हार युवा प्रतिष्ठानने केला आहे. या कथित लिखाणाच्या निषेधार्थ या संघटनेच्यावतीने चार हुतात्मा पुतळा चौकात गाढवाला आमदार आव्हाड यांची प्रतिमा लटकवून त्यास जोडे मारण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष समर्थ मोटे यांनी नेतृत्व केलेल्या या आंदोलनात भाजपचे माजी नगरसेवक तथा बजरंग दलाचे स्थानिक नेते नरेंद्र काळे यांचाही सहभाग होता.

आमदार आव्हाड यांनी केलेले लेखन हे लोकप्रतिनिधीला किंवा कोणत्याही नागरिकाला शोभणारे नाही. त्यामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांना धनगर समाज रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा काळे यांनी या वेळी बोलताना दिला. आमदार आव्हाड यांच्या लिखाणाची चौकशी करून त्यांच्या विरूध्द कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊ न दिले.

‘राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी’

सांगली – दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी मल्हारराव होळकर यांच्याबद्दल केलेल्या खालच्या दर्जाच्या लेखनाचा सांगलीतही जागोजागी आज निषेध करण्यात आला. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी या लेखनाचा निषेध करताना आव्हाडांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे. आव्हाडांमध्ये ही एवढी मस्ती कुठून आली, असा प्रश्न करत पडळकर यांनी या लेखनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा धनगर समाज त्यापासून योग्य तो धडा घेईल असा इशारा दिला आहे. दरम्यान धनगर समाजाचे सांगली युवा जिल्हाध्यक्ष अजित दुधाळ यांनी या लेखनाचा निषेध करत आव्हाडांविरोधात उद्या सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. जतमध्येही धनगर समाजाच्या तरुणांनी रस्त्यावर उतरत आव्हाड यांचा निषेध केला.