जव्हार-मोखाडा तालुक्यांच्या पाठोपाठ शहापूर तालुक्यातही गेल्या तीन महिन्यांत ३७ बालमृत्यू झाले असून ६ हजार १४८ बालके कुपोषणाच्या विळख्यात सापडली आहेत. यापैकी तब्बल एक हजार ५६ बालके तीव्र कुपोषित असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. या भयावह परिस्थितीकडे शासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले असून प्रशासकीय अधिकारीही हातावर हात धरून बसल्याने ग्रामीण भागातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शहापूर तालुक्यात कुपोषणाला आळा बसण्यासाठी बाल विकास प्रकल्प विभागाचे शहापूर व डोळखांब असे दोन विभाग करण्यात आले . मात्र यामुळे कुपोषित बालकांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली असल्याचे समजते. तब्बल २० बालकांचा मृत्यू झाला आहे तर एक ते तीन वर्षांच्या वयोगटात एक मृत्यू व तीन ते सहा वर्षांच्या वयोगटात चार बालकांचा मृत्यू झाला आहे. तसेच डोळखांब प्रकल्पात एप्रिल ते जून महिन्यांत शून्य ते एक वर्षांपर्यंतच्या वयोगटात ९ बालकांचा मृत्यू झाला आहे तर एक ते तीन वर्षांच्या वयोगटात एक मृत्यू आणि तीन ते सहा वर्षांच्या वयोगटात २ बालकांचा मृत्यू झाला आहे. असे एकूण दोन्ही प्रकल्पात ३७ बालकांचे मृत्यू झाल्याची नोंद आहे, अशी माहिती शहापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी चित्रलेखा कोठावळे यांनी दिली.
शहापूर तालुक्यात तीव्र कुपोषित बालकांची संख्या ७१९ तर डोळखांब प्रकल्पात ३३७ असे एकूण एक हजार ५६ बालके मृत्यूच्या दाढेत अडकली आहेत. तसेच शहापूर प्रकल्पात मध्यम स्वरूपाची दोन हजार ८५१ असे व डोळखांब प्रकल्पात दोन हजार २४१ असे एकूण पाच हजार ९२ कुपोषित बालकांची नोंद शासन दरबारी आहे. कुपोषणाला आळा बसावा यासाठी विविध ग्राम बालविकास केंद्रे उघडण्यात आली आहेत. त्यामधून बालकांना दूध पावडर, साखर, शेंगदाण्याचे कूट, प्रोटीन पावडर असा सकस आहार देण्यात येत असतानाही कुपोषणाचे प्रमाण कमी होत नसल्याने याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आकडा जास्त? : गेल्या तीन महिन्यांत ३७ बालकांचा विविध आजारांमुळे मृत्यू झाल्याचे बाल विकास प्रकल्प विभागाकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात हा आकडा वाढीव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर समस्येकडे शासनासह राजकीय पदाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष झाले असल्याने तालुक्याच्या दुर्गम भागांतील आदिवासींकडून संताप व्यक्त होत आहे.