मोखाडा तालुक्यातील बालमृत्यूंची ओरड झाल्यावर शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली. मंत्र्यांचे दौरे सुरू झाले अन् रुग्णालये चकचकीत करण्यात आली. सारे काही ठीकठाक असल्याचे चित्र निर्माण केले गेले. पण पावसाळा ओसरला तशी परिस्थिती बदलली. रुग्णालये पुन्हा भकास पडली. पुढील पावसाळ्यात कुपोषणाची समस्या वाढल्यावर पुन्हा धावाधाव. वर्षांनुवर्षे हेच सुरू आहे. मूळ समस्येच्या खोलात मात्र जाण्यात शासकीय यंत्रणा कमी पडत आहे.

गेल्या महिन्यात मोखाडाच्या सरकारी रुग्णालयात पोहोचलो होतो तेव्हा मंत्र्यांच्या भेटीसाठी रुग्णालये सज्ज झाली होती. कार्टूनच्या चित्रांनी सजवलेल्या भिंती आणि चादरी, चकचकीट टाइल्स यामुळे कुपोषणग्रस्त मुले व त्यांच्या आई बावरलेल्या चेहऱ्याने वावरत होत्या. आजूबाजूच्या परिसरातून शोधून आणलेल्या मुलांना दहा खाटा पुरत नसल्याने जमिनीवर आणखी १६ गाद्या घालण्यात आल्या होत्या. या खाटांची सवय नसलेले मायलेक बाहेरच बसकण मारून बसले होते. आपल्याला इथे किती दिवस ठेवणार याचीही त्यांना कल्पना नव्हती. परिचारिका प्रत्येकीच्या हातात साबण, तेल देऊन बाळाला नीट आंघोळ घालायला सांगत होत्या. महिन्याभरानंतर  हा विभाग अगदी सुनसान आहे. अवघ्या ३५ दिवसांपूर्वी इथे जत्रा भरली होती की भास झाला होता असे वाटावे अशी स्थिती सध्या तिथे आहे. खाटांवरच्या चादरी नाहीशा झालेल्या, गाद्या एका बाजूला रचून ठेवलेल्या. भकास वाटणाऱ्या या विभागात नाही म्हणायला दोन खाटांवर दोघीजणी बाळाला घेऊन बसल्या होत्या. परिचारिकांचा पत्ता नव्हता. कोण येतेय, जातेय त्याची चौकशी करावी असेही कोणाला वाटत नव्हते. डॉक्टरही टेबलवर पाय सोडून गप्पा मारत बसले होते.

रोजगार देणे गरजेचे

गेल्या महिन्यात आंदोलन झाल्यावर जव्हार मोखाडातील अंगणवाडी सेविकांचे गेल्या सहा महिन्यांचे अध्रे पगार देण्यात आले. वाडा, विक्रमगड येथे जुलपासून अध्रे पगारही झालेले नाहीत. अंगणवाडी मदतनीसांचेही पगार आलेले नाहीत. अंगणवाडी सेविका, डॉक्टर, परिचारिका हे सरकारचे हात आहेत पण तेच दुबळे ठेवले आहेत. आहारचे पसे आले आणि अंगणवाडीत आठवडय़ातून चार दिवस अंडी व केळी देण्यास सुरुवात झाली. याव्यतिरिक्त रुग्णालयाच्या स्तरावर व त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे स्थलांतर रोखण्यासाठी तातडीने रोजगारनिर्मिती उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कागदावरही योजना झालेली नाही, असे पालघरमधील श्रमजीवी संघटनेचे प्रमुख व माजी आमदार विवेक पंडित म्हणाले.

  • वाडा ग्रामीण रुग्णालयातील स्थिती वेगळी नाही. पण कुपोषित मुलांच्या छोटेखानी खोलीत पाय ठेवताच डॉक्टर धावत आले. पाच खाटांचा विभाग कमी पडतो म्हणून डॉक्टरांच्या राहण्याच्या खोलीत दहा खाटांचा नवीन विभाग सुरू करायचा होता.
  • त्यासाठी खोली रिकामी करण्यातच महिना गेला. डॉक्टरांनी ती खोलीही आवर्जून दाखवली. आता ही नवीन खोली आठवडाभरात सजवू, अशी आशा डॉक्टरांना वाटत होती. पण मुळात पाच खाटांचा वॉर्डही रिकामाच पडला होता. अवघे एक बाळ इथे उपचार घेत होते.
  •  सप्टेंबर महिन्यात १३ तर ऑक्टोबरमध्ये ९ बालके येथे उपचारांसाठी आली. दिवाळीनंतर अध्र्याहून अधिक आदिवासी मुलांना घेऊन नाशिकच्या वीटभट्टी आणि खडी फोडण्याच्या कामावर जाण्यासाठी तयारीला लागले आहेत. तेव्हा तर हे नव्याने सुरू केलेले वॉर्ड आणखीच भकास दिसतील.

गेल्या महिन्यात कुपोषित बालकांच्या मृत्यूमुळे आंदोलन आणि त्यानंतर मंत्र्यांची भेट ठरली तेव्हा गोळाउपचारांसाठी तब्बल ९१ कुपोषित मुलांना आणले गेले होते. त्यापकी ५८ तीव्र कुपोषित तर ३९ कुपोषित होती.

मंत्र्यांचा दौरा आटोपला आणि ऑक्टोबरमध्ये उपचारांसाठी आलेल्या बालकांची संख्या २६ वर घसरली. जवळच्याच चासा गावातून रमा जाधव यांना काíतक या एका वर्षांच्या मुलासह इथे आणले आहे. अंगणवाडी सेविकेने रुग्णालयात जायला सांगितले, असे रमा म्हणाल्या.

आणखी किती दिवस ठेवणार त्याची माहिती नव्हती. मंत्री आल्यावर घाईघाईने सुरू केलेल्या दुसऱ्या वॉर्डमध्ये दाखल असलेल्या जानी माळी त्यांच्या दोन वर्षांच्या- युवराजसह उपचार घेताहेत. उन्हाळी कामावर नाशिकला जायचेय, त्याआधी इथे येऊन राह्य़लोय, असे त्या म्हणाल्या.