11 December 2017

News Flash

गरिबांमध्येच नव्हे तर श्रीमंतांमध्येही आहार मूल्यांचा अभाव

मुलांमधील कुपोषणाचा मुद्दा चव्हाटय़ावर

ज्योती तिरपुडे, नागपूर | Updated: August 11, 2017 2:25 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

विद्यापीठातील संशोधनातून मुलांमधील कुपोषणाचा मुद्दा चव्हाटय़ावर

अंगणवाडीत खिचडी मिळते म्हणून बालकांचे योग्य पोषण होते किंवा उत्तम आर्थिक स्थिती आहे म्हणून योग्य पोषण आहार घेतला जातो, या दोन्ही गोष्टी एका संशोधनाअंती खोटय़ा ठरल्या आहेत. नागपूर विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागाने शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात अंगणवाडीतील मुलांना पोटभर अन्न मिळत नाही आणि खासगी इंग्रजी शाळांच्या मुलांना ते मिळत असूनही योग्य आहार मूल्यांची त्यांना चाड नाही, असे दिसून आले. अंगणवाडीची मुले कुपोषित तर खात्या-पित्या घरची इंग्रजी माध्यमांतील मुलांमध्ये कमालीचा लठ्ठपणा दिसून आला.

अनुभा साहू नावाच्या विद्यार्थिनीने ‘न्युट्रिशनल स्टेटस अॅण्ड फिजिकल ग्रोथ ऑफ प्री स्कूल चिल्ड्रन’ या विषयावरील पीएच.डी. काही महिन्यांपूर्वी नागपूर विद्यापीठात सादर केली आहे. तिला प्राध्यापक डॉ. प्राजक्ता नांदे यांचे मार्गदर्शन लाभले. नागपुरातील सहा विधानसभा मतदारसंघातील अंगणवाडय़ा आणि खासगी शाळेतील केजीची प्रत्येकी १५० मुलगे व मुली त्यांनी सर्वेक्षणासाठी निवडल्या. तीन, चार आणि पाच वर्षांच्या मुलांची उंची, वजन, हाताचे व पायाच्या पंजांची लांबी व रुंदी, हाताची वीत, हाताच्या दंडाची कोपरापर्यंतची लांबी आणि गोलाई इत्यादी निकष लावले. योग्य पोषणा अभावी अंगणवाडीतील मुलांच्या शारीरिक वाढीवर तीव्र परिणाम आढळले.

केजीच्या काही मुलांमध्ये कमालीचा लठ्ठपणा दिसून आला. कारण आईवडील दोघेही कामाला जात असल्याने मुलांमध्ये फास्ट फुड, जंक फुडचे सेवन जास्त. त्यामुळे शरीरात चरबीचे प्रमाण वाढलेले. त्याच वेळी अंगणवाडीत जाणाऱ्या मुलांच्या पालकांची आर्थिक स्थिती नसल्याने मुलांना आवश्यक अन्नपदार्थ खरेदी करून खाऊ घालण्याची क्षमताही त्यांच्यात नाही. माध्यान्ह भोजन अंगणवाडीत मिळत असले तरी घरी नेल्यावर त्या अन्नाची वाटणी होते. त्यामुळे त्या वयात आवश्यक तेवढय़ा कॅलरीज शरीराला मिळत नाही. एकूणच योग्य खानपानाविषयी अज्ञान तर काही ठिकाणी ते खरेदी करण्याची क्षमताच नसल्याचे अभ्यासांती पुढे आले.

सर्वेक्षणातील निरीक्षणे

  • तीन वर्षांच्या मुलींमध्ये ४७ टक्के कुपोषण आढळले. चार वर्षांवरील मुलांमध्ये ४० टक्के (मुली) आणि ३० टक्के (मुलगे) तसेच ५ पेक्षा जास्त वय असलेल्या मुलांमध्ये २८ (मुली) आणि ४२ टक्के (मुलगे) कुपोषण आढळले. इंग्रजी शाळेत केजीमध्ये शिकणाऱ्या मुलांमध्ये चुकीच्या अन्नाची निवड हे कुपोषणाचे कारण होते तर अंगणवाडीच्या मुलांना माफक पोषण आहार मिळत नसल्याने कुपोषण आढळले.
  • अंगणवाडीतील मुलांच्या हाताच्या पंजाची रुंदी खासगी शाळेतील मुलांपेक्षा कमी आढळली. उदाहरणार्थ अंगणवाडीतील ३ वर्षे वयाच्या मुलींच्या पंजाची रुंदी ५.८ सेंटिमीटर होती. मात्र त्याच वयोगटातील केजीतील मुलींची रुंदी ६.३ सेंटिमीटर होती. तीच बाब हाताच्या लांबीचीही होती. अंगणवाडीतील तीन वर्षांच्या मुलांची सरासरी हाताची लांबी १० सेंटिमीटर असताना केजीच्या मुलाची ती ११.१० सेंटिमीटर होती. तसेच प्रमाण हाताच्या वितीच्या बाबतीत आहे. अंगणवाडीच्या मुलांची हाताची वीत केजीच्या मुलांच्या तुलनेत कमी लांबीची होती. तसेच पायाच्या पंजाची रुंदी ही देखील कमी होती.

अंगणवाडीची मुले माघारलेलीच!

सामान्यत: तीन ते पाच वयोगटांतील मुलांची हाताच्या दंडाची गोलाई १३.६ ते १९.२ सेंटिमीटर असायला हवी. मात्र याबाबतीत काही मुले तर फारच कुपोषित होती. त्यांच्या दंडाची गोलाई १२.२ सेंटिमीटरपेक्षाची कमी आढळली. वेगवेगळ्या अन्नघटकांमार्फत मुलांचे प्रथिनांचे सेवन या वयात दुप्पट असायला हवे. कारण शरीरातील स्नायू बळकट होण्यास मदत होते. पण दूध, डाळी, अंडी हे अन्नघटक अंगणवाडीतील मुलांच्या सेवनात येत नाहीत. त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या, पिवळ्या रंगाची फळे, भाज्यांचे सेवन इंग्रजी केजीची मुले टाळतात. या मुलांमध्ये कॅरोटिनचे प्रमाण फारच कमी आढळले. म्हणजे ‘अ’ जीवसत्त्वाचा अभाव केजीच्या मुलांमध्येही दिसून आला.

या विषयावरील नमुने गोळा करणे कष्टप्राय होते. एकेका मुलाचा अभ्यास सहा महिन्यांनी करायचा होता. त्यामुळे नमुने जास्त घेतले. प्रत्येक झोनमधून १० अंगणवाडय़ा आणि चार केजी शाळा निवडल्या. मुलांमध्ये लोह आणि फॉलिक अॅसिडचे सेवनही कमी होते. पालकांनी परवानगी न दिल्याने मुलांच्या रक्ताची तपासणी करता आली नाही. अन्यथा हिमोग्लोबिन तपासता आले असते. अंगणवाडीच्या मुलांचे हिमोग्लोबिनदेखील कमी असण्याची शक्यता आहे. कारण लोह, फॉलिक अॅसिड, प्रथिने, कॅल्शिअम, योग्य कॅलरीजची मुलांमध्ये खरोखर कमतरता आहे. –डॉ. प्राजक्ता नांदे, प्राध्यापक, पदव्युत्तर गृह विज्ञान विभाग

 

First Published on August 11, 2017 2:25 am

Web Title: malnutrition problem in maharashtra