माळशेज घाट हा पावसाळ्याच्या दिवसांत पर्यटकांसाठी उत्तम पर्वणी असतो. त्याठिकाणी आज दरड कोसळली. घाटातील छत्री पॉईंट याठिकाणी ही दरड कोसळली असून सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. दरड कोसळल्यानंतर घाट रस्त्यावर दगडांचा मोठा खच साचला होता. त्यामुळे वाहने पुढे जाण्यात अडचणी येत होत्या. दरड कोसळली त्यावेळी सुदैवाने याठिकाणी कोणतेही वाहन नसल्याने दुर्घटना घडली नाही. आता वाहतूक पूर्वपदावर आल्याचेही संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलिसांनी ताबडतोब दोन्ही बाजूने येणारी वाहतूक थांबवली असून घाटात वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी व कर्मचारी याठिकाणी तातडीने रवाना झाले, दगड हटविण्याचे काम पूर्ण होत आले आहे. वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली असल्याचेही राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंते दिनेश महाजन यांनी सांगितले.

माळशेज घाटात वर्षभर पर्यटकांची वर्दळ असतेच. पावसाळ्याच्या दिवसांत या घाटातून दिसणारे निसर्गाचे नयनरम्य रुपडे पाहण्यासाठी पर्यटक याठिकाणी मोठी गर्दी करतात. पावसाळ्यातील हिरवाई आणि कोसळणारे धबधबे यामुळे घाटाचे रुप अक्षरश: बदलून जाते. त्यातही आज शनिवार असल्याने याठिकाणी बरीच गर्दी होती. पावसाच्या दिवसांत या घाटात अनेकदा दरडी कोसळण्याच्या घटना होतात. त्यातच येथील रस्ताही चिंचोळा असल्याने अपघात होण्याचे प्रमाणही असते. मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत वाहतूक थांबविल्याने अनर्थ टळला.