मोबाइल व इंटरनेटच्या जमान्यातही मालवणीची गोडी कायम आहे. या भाषेला व्यासपीठ मिळाले पाहिजे. आजच्या आधुनिक काळात मालवणी भाषेची गोडी वाढविण्यासाठी प्रचार, प्रसार व्हायला पाहिजे, असे सावंतवाडी संस्थानच्या राजमाता श्रीमंत सत्त्वशीलादेवी भोसले यांनी म्हटले.
येथील आरपीडी हायस्कूलच्या नवरंग कलामंचावर ओंकार कला मंच व भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मालवणी एकांकिका महोत्सव, छायाचित्रकार अनिल भिसे फोटो प्रदर्शनाचा शुभारंभ केल्यानंतर राजमाता भोसले बोलत होत्या.
या वेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, मालवणी कलाकार लवराज कांबळी, भाई कलींगण, पोलीस निरीक्षक रणजीत देसाई, ओंकार कलामंच अध्यक्ष अमोल टेंबकर, भाईसाहेब प्रतिष्ठानचे विक्रांत सावंत, ज्येष्ठ पत्रकार अरविंद शिरसाट, डी. के. सावंत, अभिमन्यू लोंढे, मालवणी कवी दादा मडकईकर, मुख्यमंत्र्यांचे तत्कालीन माहिती अधिकारी सतीश पाटणकर, नगरसेविका साक्षी कुडतरकर, संजय पेडणेकर आदी उपस्थित होते.
मोबाइल व इंटरनेटसारख्या आधुनिक युगात मालवणी भाषेची गोडी टिकविणे आवश्यक बनले आहे. मालवणी एकांकिकेमुळे निश्चितच मालवणी भाषेचा प्रसार होईल. आपल्या भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुढील काळात प्रयत्न होतील, असे राजमाता भोसले म्हणाल्या.
सावंतवाडीच्या राजघराण्याने सांस्कृतिक कलेला राजाश्रय दिला. त्यामुळे सावंतवाडीला सांस्कृतिक कलेची राजधानी म्हणून ओळखली जाते. मालवणी भाषेची अवीट गोडी बोलीतून अधिक निर्माण करण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असे नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले.
दशावतार कलेनेच कोकणात अनेक नाटय़सम्राट निर्माण केले असे मी मानतो, असे मालवणी नाटय़ कलावंत लवराज कांबळी कांबळी म्हणाले. दशावतारी कला ही कलाकारांची नाटय़शाळाच आहे असे सांगून यापुढील काळात मालवणी नाटय़ महोत्सवाच्या आयोजनासाठी सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून मालवणी बोली भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी महोत्सव घेऊ या, असे लवराज कांबळी म्हणाले.
या वेळी पोलीस निरीक्षक रणजीत देसाई यांनी शुभेच्छा दिल्या. मालवणी कवी दादा मडकईकर यांनी प्रास्ताविक केले, तर ओंकार कलामंचाचे अध्यक्ष अमोल टेंबकर, भाईसाहेब प्रतिष्ठानचे विक्रांत सावंत यांनी सर्वाचे स्वागत केले.
या वेळी दशावतारी नाटय़ कलाकार बाबी कलींगण यांना मरणोत्तर सन्मान पुरस्कार सुपुत्र भाई कलींगण यांनी स्वीकारला. तसेच विलास खानोलकर, अरविंद शिरसाट, सतीश पाटणकर, प्रतिभा चव्हाण यांचादेखील सन्मान करण्यात आला. अमोल टेमकर यांनी आभार मानले.
या वेळी मालवणी करंडकचे सचिव हसन खान, खजिनदार ऋजल पाटणकर, सदस्य सचिन मोरजकर, निरंजन सावंत, मिलिंद कासार, आनंद काष्टे, संदीप सावंत, आनंद जाधव, चैतन्य सावंत, प्रवीण मांजरेकर आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. मालवणी एकांकिका स्पर्धा परीक्षण अरविंद शिरसाट व सतीश पाटणकर करत आहेत.