आज राज्यभरात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. राजकारण्यांसह सेलिब्रेटी मंडळीही ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.

‘महाराष्ट्र दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील माझ्या सर्व भाऊ-बहिणींना शुभेच्छा’, असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र दिनासोबतच गुजरातचा स्थापना दिवसही असल्याने पंतप्रधान मोदींनी गुजराती जनतेलाही गुजरात दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवरुन त्यांनी गुजरात आणि महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ! महाराष्ट्राच्या निरंतर प्रगती आणि समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो. हे राज्य प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचावे आणि देशाच्या विकासाच्या प्रवासात त्याचे योगदान असेच वाढत जावे, असं ट्विट मराठी भाषेत मोदींनी केलं. तर गुजरातचे लोक हे नेहमी त्यांच्या साधेपणासाठी व व्यापारी कौशल्यासाठी ओळखले जातात. स्वातंत्र्य चळवळीत आणि देशाच्या वाटचालीत गुजरातने मोलाची कामगिरी बजावली आहे. भविष्यातही अशाच प्रकारे भारताच्या विकासात हातभार लावावा असे ट्विटरद्वारे मोदींनी म्हटले आहे.