दम्याचा त्रास होत असल्याने ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शहापुरातील एका ६७ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. खासगी लॅबमध्ये केलेल्या चाचणीच्या अहवालानंतर त्यांना करोना झाल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान, यामुळे शहापुरात खळबळ माजली असून अफवांना उधाण आलं आहे.

शहापूर तहसील कार्यालयाच्या परिसरात राहणाऱ्या एका ६७ वर्षीय व्यक्तीला दम्याचा त्रास होत असल्याने त्याला प्रथम शहापुरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित रुग्णाला ७ एप्रिल रोजी ठाणे येथील होरिझन या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णाची ठाण्यातील एका खाजगी लॅबमध्ये करोनाची चाचणी केली असता त्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान,  खबरदारी म्हणून ते राहत असलेली संपूर्ण इमारत व परिसर सील करण्यात आला आहे. तसंच इमारतीमधील रहिवाशांना बाहेर पडू नये असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर आरोग्य विभागाचे पथक संबंधित रुग्णाच्या घरी जाऊन रुग्णांच्या नातेवाईकांची तपासणी करण्याच्या दृष्टीने पाठपुरावादेखील करत आहे. हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे शहापुरच्या तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी सांगितले असून याबाबत गुरुवारी रात्रीपासून आवश्यक कार्यवाही करण्यात आल्याचे त्यानी स्पष्ट केले. शहापुरात याबाबत अफवांना उधाण आलं असून अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन त्यानी यावेळी केले.