शोध घेणाऱ्या पोलीस पथकाचा सत्कार

अडीच वर्षांच्या चिमुरडीचे आई-वडिलांच्या ताब्यातुन अपहरण करुन नंतर तिच्यावर बलात्कार करुन फरार झालेल्या नराधम बाळू गंगाधर बर्डे (३०, रा सोनगाव पाथरी, राहुरी) याला कोतवाली पोलिसांच्या पथकाने अखेर महिनाभराच्या शोध मोहिमेनंतर अटक केली. या पथकाच्या सापळ्यातुन बर्डे दोनदा निसटला होता. मात्र आज सकाळी नगर रेल्वे स्थानकाच्या परिसरात त्याच्या नागरिकांच्या मदतीने मुसक्या आवळण्यात यश आले. पथकाच्या कामगीरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी कौतुक करुन त्यांना १० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.

सहायक अधीक्षक चिन्मय पंडित व कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या नेतृत्वाखालील सहायक निरीक्षक संदीप पाटील, हवालदार राजेंद्र मुळे, आण्णा बर्डे, रमेश वराट, श्रीकांत नरोडे यांच्या पथकाने त्याला पकडले. बालिकेच्या आई-वडिलांनीही त्याला ओळखले, घटनेच्या वेळचे त्याचे कपडेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. बाळू बर्डे याला उद्या, सोमवारी न्यायालयापुढे हजर केले जाईल.

मजुरीसाठी राहुरीहून नगरला आलेल्या दाम्पत्याकडील अडीच वर्षांच्या मुलीचे बर्डे याने गेल्या ९ डिसेंबरच्या सायंकाळी नगरच्या रेल्वे स्थानकावरुन अपहरण केले. तिच्यावर केडगाव औद्योगिक वसाहतीत बलात्कार केला. मुलगी अत्यंत गंभीर अवस्थेत पोलिसांना आढळली, मात्र तिच्या आई,वडिलांचा तपास लागत नव्हता. कोतवाली पोलीसांनी तिच्या आई,वडिलांचा शोध घेतला. मुलीला पुण्याच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आरोपी फरार होता. त्याच्या अटकेसाठी महिला संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

पोलीस पथक राज्यभर त्याचा तपास घेत होते. दोन वेळा तो नगरमध्ये आल्याची माहिती नागरिकांनीच पथकाला दिली, मात्र ऐनवेळी तो निसटला होता. अखेर त्याला अटक करण्यात आली. मुलीची प्रकृती सुधारत असली तरी तिला अद्याप वैद्यकिय पथकाच्या पोलिसांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.