पाकिस्तानच्या आयएसआयला माहिती पुरवणाऱ्याला नाशिकमध्ये अटक करण्यात आली आहे.नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाला या व्यक्ती बाबत गोपनीय माहिती मिळाली होती. एचएएल अर्थात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमानं तयार करणाऱ्या कंपनीविषयीची संवेदनशील माहिती हा माणूस माहिती पुरवत होता. ज्याला अटक करण्यात आली आहे तो हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीत कर्मचारी होता. हा कर्मचारी पाकिस्तानच्या आय. एस. आय. गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात असून भारतीय बनावटीच्या विमानांची, विमानांच्या संवेदनशील तांत्रिक तपशीलाची, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या नाशिक येथील विमान कारखान्याची तसेच कारखाना परिसरातल्या प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआयला पुरवत होता. त्यावरुन या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तीन मोबाइल्स, ५ सीमकार्ड आणि दोन मेमरी कार्ड्स जप्त करण्यात आली आहेत. हे सगळे साहित्य फॉरेन्सिक सायन्स लॅबरोटरीमध्ये पाठवण्यात आले आहे.

संशयित कर्मचारी गुणवत्ता- नियंत्रण विभागात होता. काही महिन्यांपूर्वी त्याची प्रक्रिया विभागात बदली करण्यात आली होती. व्यवस्थापनाच्या या निर्णयाविरोधात त्याने आंदोलन केले होते.

एचएएल या कंपनीच्या या कर्मचाऱ्याविरोधात कलम ३, ४ आणि ५ शासकीय गुपिते अधिनियम, १९२३ अन्वये दाखल करण्यात आला आहे. या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक देवेन भारती, महाराष्ट्र राज्य व पोलीस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह, पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्या नेतृत्त्वात सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील यादव, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप घुगे, प्रतिमा जोगळेकर, पोलीस उप निरीक्ष राजराम सानप, पोलीस हवालदार संपत जाधव, संजय भुसाळ, विलास वाघ, सुदाम सांगळे, पोलीस नाईक दीपक राऊत, प्रमोद उबाळे व पोलीस शिपाई गोविंद जाधव यांनी कारवाई पार पाडली.