शेतात अनाधिकृतरित्या बांधलेली झोपडी जमीनदोस्त केल्याच्या रागातून एका व्यक्तिने वनविभागाच्या कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली. याप्रकरणी संबंधित आरोपीला अटक करण्यात आले आहे. नवापूर तालुक्यातील उकाळापाणी शिवारातील गुजरात महाराष्ट्र सीमावर्ती भागात चार हेक्टर जमीनीवर अतिक्रमण करणाऱ्यांवर वनविभागने कारवाई केली. सूचना देऊनही अतिक्रमण न हटवल्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस आणि वनविभागाचा मोठा फौजफाटा घेऊन मंगळवारी वनक्षेत्रातील अतिक्रमण केलेल्या जमीनीवरील पिक नष्ट केले.

यावेळी शेतातील एक झोपडीही जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईच्या रागातून भावीन रमेश कोकणी रा.रायपूर याने नवापूर येथील वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांना मारहाण केली. बुधवारी संध्याकाळी गांधी पुतळ्याजवळील वनपरिक्षेत्र अधिकारी निवासीस्थळी घरात घुसून हुज्जत घालत त्याने वनक्षेत्रपालास मारहाण केली.याप्रकरणी वनक्षेत्रपाल हाडपे यांनी नवापूर पोलिस ठाण्यात भावीन कोकणी विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर भावीन कोकणी विरोधात वनविभाग कलमानुसार, विविध गुन्हे दाखल करण्यात आले. रात्री उशिराने भावीनला अटक करण्यात आली. शहादा वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदीवे, वनक्षेत्रपाल चिंचपाडा आर. बी. पवार व कर्मचारी यांनी पोलीस स्टेशनला भेट देत घटनेचा संताप व्यक्त केला.