संगमेश्वर तालुक्यातील सखाराम महादेव बोले (वय ५०, रा. बोलेवाडी-आंबेड खुर्द) याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
जिल्ह्य़ात अशा प्रकारच्या गुन्ह्य़ाबद्दल जन्मठेप होण्याची ही पहिलीच घटना आहे. गेल्या वर्षी ३ डिसेंबर रोजी संबंधित बालिका घरात जेवण करण्यासाठी आली असता बोले याने तिच्यावर अत्याचार केले होते. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोहर चिखले यांनी अत्याचारांबरोबर लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२ नुसारही बोले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. तसेच सरकार पक्षातर्फे करण्यात आलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य़ धरून बोले याला जन्मठेपेची शिक्षा आणि एकूण तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्यापैकी वीस हजार रुपये संबंधित पीडित बालिकेला देण्यात यावेत आणि उरलेले दहा हजार रुपये सरकारी तिजोरीत जमा करावेत, असाही आदेश न्यायालयाने दिला आहे.