मेहुण्याचा खून केल्याच्या आरोपावरून शंकर ऊर्फ भगीरथ बचकू झा यास अलिबाग येथील अतिरिक्तसत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांनी जन्मठेप व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपीला आणखी ६ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागेल, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. या खटल्याची हकीगत अशी की, आरोपी शंकर ऊर्फ भगीरथ .बचकू झा हा मृत दीपक लड्ड यादव याचा सख्खा मेहुणा होता. दोघेही .खालापूर येथील रविकमल मिलमध्ये कामाला होते. या दोघांमध्ये बरेच दिवस वाद सुरू होता. याच रागातून शंकरने १४ जुल २०१३ रोजी दीपक यादव याच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला. त्यात दीपक जागीच मरण पावला. त्यानंतर शंकरने त्याचे प्रेत कंपनीच्या खिडकीतून मागील बाजूस असलेल्या ओढय़ामध्ये टाकून दिले व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर पोलिसांनी शंकर झा याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला अलिबाग न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांच्या न्यायालयासमोर चालला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. महेश ठाकूर यांनी १० साक्षीदारांची साक्ष नोंदवली. साक्षीदारांपकी फिर्यादी व पंच साक्षीदार तसेच वैद्यकीय अधिकारी यांचा पुरावा न्यायालयाने ग्राहय़ धरला. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपी शंकर झा याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.